आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय वाद:खोत यांच्या धाब्यावरील उधारीवरून सांगोल्यात राजकीय वादाचा तडका; सदाभाऊ खोत यांच्यावर पलटवार

सांगोला10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या संस्कृतीत अन्न हे पूर्णब्रह्म मानले जाते. खाल्लेल्या अन्नाची नेहमीच जाणीव ठेवली पाहिजे. ही आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे. महाराष्ट्राचे माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी वाढेगाव येथील हॉटेलवर फुकट खाल्ले असेल तर त्या हॉटेल मालकाची उधारी देऊन विषय संपवून टाकावा. तो हॉटेलमालक काय करतो? कोणत्या पक्षाचा आहे? यापेक्षा असेल ती उधारी देऊन हा विषय त्याच दिवशी सदाभाऊ खोत यांनी संपवायला हवा होता, असा पलटवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार दीपक साळुंखे यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर केला आहे.

१६ जून रोजी सांगोला येथे लोकसभा निवडणुकीत केलेल्या ६६ हजार ४४५ रुपये उधारीची मागणी अशोक शिनगारे या हॉटेल मालकाने सांगोला दौऱ्यावर असलेल्या माजी मंत्री खोत यांना पंचायत समितीसमोर अडवून केली होती. यानंतर हा प्रकार संपूर्ण राज्यभर चांगलाच गाजला होता. घटनेनंतर सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषदेत शिनगारे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. त्याच्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार साळुंखे यांचा हात असल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर साळुंखे यांनी स्पष्टीकरण केले.

साळुंखे म्हणाले, २०१७ मधील पंचायत समितीच्या निवडणुकीत अशोक शिनगारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात शेतकरी संघटनेकडून निवडणूक लढवली होती. तरीही, खोत यांनी लोकांची निव्वळ दिशाभूल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसवर खापर फोडण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे.

उधारीचा राष्ट्रवादीशी संबंध नाही
हॉटेल मालक अशोक शिनगारे आणि २०१४ मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून लोकसभा लढविलेले खोत यांच्यातील व्यवहार हा २०१४ चा आहे. तेव्हा आम्ही मोहितेंच्या प्रचारात होतो. खोत आणि शिनगारे हे दोघेही आम्हाला विरोध करत होते. शिवाय हॉटेल मालक शिनगारे यांनी त्यानंतर २०१७ मध्ये झालेली पंचायत समितीची निवडणूक ही राष्ट्रवादीच्या विरोधात शेतकरी संघटनेतून लढवली होती. त्यामुळे हा व्यवहार शिनगारे आणि खोत यांच्यातील आहे. त्याचा राष्ट्रवादी काँग्रेसशी काडीचाही संबंध नाही.''
दीपक साळुंखे, प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

उधारीचे पुरावे काय ? : भारत चव्हाण
रयत क्रांतीचे सदाभाऊ खोत सांगोला दौऱ्यावर आल्यानंतर त्याना अडवून २०१४ मधील लोकसभा निवडणुकीदरम्यान केलेल्या उधारीची मागणी करणारे धाबाचालक रमेश शिनगारे यांच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत. याप्रकरणी रयत क्रांतीचे तालुकाध्यक्ष भारत चव्हाण म्हणाले, खोत यांच्याकडे शिनगारे यांची कसलीच उधारी नाही. त्यांनी उधारी कधी केली याच्या दिलेल्या तारखा निवडणुकांनंतरच्या आहेत. खोत यांना अडवून पैशाची मागणी करताना शिनगारे यांनी लोकसभा निवडणूक काळातील उधारी असल्याचे म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...