आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात अमली पदार्थांची विक्री आणि तस्करी होऊ नये यासाठी पोस्ट कार्यालय आणि खासगी कुरिअरच्या गोडावूनची तपासणी डॉग स्क्वॉडद्वारे केली जाणार असल्याची माहिती, जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली.
जिल्ह्यात अमली पदार्थांवर आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय अमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीची पहिली बैठक झाली. तीत पोलिस अधीक्षक सातपुते मार्गदर्शन करीत होत्या. सोलापूर पोस्ट विभागाचे वरिष्ठ अधीक्षक ए. व्यंकटेश्वर रेड्डी, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक नितीन धार्मिक, केंद्रीय कस्टम विभागाचे सीमा शुल्क अधीक्षक फुलचंद राठोड, नायब तहसीलदार आर.आर. कुरणे, औषध निरीक्षक सचिन कांबळे, कृषी उपसंचालक राजकुमार मोरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुहास जगताप आदी उपस्थित होते. श्रीमती सातपुते म्हणाल्या, जिल्ह्यात खसखस आणि गांजाची लागवड होऊ नये, याबाबत कृषी विभागाने दक्षता घ्यावी. कृषी सहायकाने पीक नोंदीची माहिती घेताना काही आढळले तर पोलिस विभागाला कळवावे. पोस्ट विभागाने आणि खासगी कुरिअरवाल्यांनी बारकाईने लक्ष द्यावे. पोस्टाची आणि खासगी कुरिअरची पाकिटांची गोडावूनची तपासणी नियमित करतील. शिवाय जिल्ह्यातील व्यसनमुक्ती केंद्रांची माहिती घ्यावी. या केंद्रात येणाऱ्यांकडून काय व्यसन होते, अमली पदार्थ माहिती आहेत का, याची माहिती संकलित करावी. या केंद्रावरही दक्षता ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. अमली पदार्थाचे व्यसन असेल तर ते लगेच सुटू शकत नाही.
अन्न व औषध प्रशासनाने दक्षता घेतली पाहिजे
मेडिकल वापरासाठी आलेली औषधे ड्रग्ज म्हणून वापर होऊ नये, याची दक्षता अन्न व औषध प्रशासनाने घ्यावी. राज्य उत्पादन शुल्क विभागाने रासायनिक कारखान्यांमध्ये अमली पदार्थांचे उत्पादन होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. ड्रग्ज डिटेक्शन कीट आणि तपासणीसाठी लागणारे रसायन हे पोस्ट कार्यालय, एलसीबी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे असायला हवे, अशा सूचनाही पोलिस अधीक्षक सातपुते यांनी दिल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.