आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधींच्या समर्थनार्थ आंदोलन:किमान पोस्टकार्ड तरी पंतप्रधानांपर्यंत पोहचवा, गहाळ होऊ देऊ नका- आमदार प्रणिती शिंदे

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विरोधी पक्षांना संसदेतही बोलू दिले जात नाही. त्यामुळे लोकशाही व्यवस्थेतील टपाल सेवेच्या माध्यमातून पाठवलेले पत्र तरी किमान पंतप्रधानांपर्यंत संबंधित विभागाने पाठवावे, अन्यथा तेही मध्येच गहाळ होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन काँग्रेसच्या आमदार तथा प्रदेश कार्याध्यक्ष प्रणिती शिंदे यांनी केले.

युवक काँग्रेसतर्फे सोमवारी (दि. 3) राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 5 हजार टपाल पाठविण्यात आले. त्याच्या शुभारंभप्रसंगी आमदार शिंदे बोलत होत्या.

जोरदार घोषणाबाजी

रेल्वे स्टेशन जवळील मुख्य पोष्ट कार्यालय येथून युवक काँग्रेसतर्फे टपाल पाठविण्यात आले. युवक शहराध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

काय म्हणाल्या प्रणिती शिंदे?

यावेळी आमदार शिंदे म्हणाल्या,“युवक काँग्रेसतर्फे देशभरात टपाल पाठवून त्यांना प्रश्न विचारण्यात येत आहे. लोकशाहीची गळचेपी थांबवा, देशभरातून नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांना पंतप्रधानांनी उत्तर द्यावे. लोकशाहीची गळचेपी हा राहूल गांधी व अदानींचा विषय नसून सर्वसामान्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. भाजपचे खासदार, आमदारांनी खूप गंभीर गुन्हे केले तरी त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. मग, फक्त विरोधी पक्षाच्या लोकांवर कारवाई हे लोकशाही व्यवस्थेला घातक आहे.”

यावेळी युवक काँग्रेसच प्रदेश सचिव श्रीकांत वाडेकर, अनंत म्हेत्रे, प्रवीण जाधव,ओमकार गायकवाड, विश्वराज चाकोते, उत्तर विधानसभा अध्यक्ष महेश लोंढे, सुमित गडगी, प्रवीण वाले, प्रतीक आबुटे, राजासाहेब शेख, शरद गुमटे,अनिल जाधव, युवराज जाधव, विवेक इंगळे इतर युवक काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टोपीच्या रंगाने वेधले लक्ष

युवक काँग्रेसने टपाल प्रश्न पाठवून आंदोलन केले. आंदोलनस्थळी लावण्यात आलेल्या बॅनवर राहुल गांधी यांनी कपाळावर टिळा व भगव्या रंगाची टोपी घातलेला फोटो आहे. गांधी टोपीचा रंग भगवा झाला? कपाळावर गंधाचा टिळा आला? असा प्रश्न युवक काँग्रेसचे आंदोलन पाहणाऱ्यांच्या सर्वसामान्य सोलापूरकरांच्या मनात आला.

टपालद्वारे युवक काँग्रेसने प्रश्न

- राहूल गांधी यांची खासदारकी रद्द केली, ही कारवाई लोकशाही विरोधी नाही का?

- अदानींच्या शेल कंपन्यांमध्ये गुंतवलेले 20 हजार कोटी कोठून आले? पैसे कोणाचे?

- देशाच्या बाहेरील अदानींच्या शेल कंपनी नेमक्या कोणाच्या आहेत?

- मागील 20 वर्षांत अदानींने भाजपला किती पैसे दिले?

- मोदीजी तुमच्या परदेश दौऱ्यावर अदानी तुमच्या सोबत किती वेळा आले?