आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:पुण्याच्या येरवडा कारागृहातील कैदी हातमागावर पैठणी बनवण्यात व्यग्र, 20 हजार रुपयांत मिळेल भरजरी साडी

सोलापूर / संजय जाधवएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
हातमागावर भरजरी पैठणी बनवण्यात व्यग्र एक कैदी. - Divya Marathi
हातमागावर भरजरी पैठणी बनवण्यात व्यग्र एक कैदी.
  • राज्यभरातून खरेदीसाठी आगाऊ नोंदणी; कारागृहाच्या दुकानात उपलब्ध

पुण्यातील येरवडा कारागृहातील कैदी अत्यंत सुबक, आकर्षक अशा हातावरील भरजरी पैठणी साड्या तयार करत आहेत. या पैठण्यांना राज्यभरातून मोठी मागणी आहे. भरजरी आणि साधी पैठणी अशा दोन पद्धतीच्या साड्या कारागृहाच्या दुकानात नागरिकांना खरेदी करता येणार आहेत. आगाऊ नोंदणी केल्यास ती आपल्याला वेळेत मिळू शकते.

तुरुंगात कैदी विविध कामे करतात. त्यातील एक विभाग म्हणजे पैठणी तयार करण्याचा. या विभागात दोन मुख्य कारागीर असून त्यांच्या मदतीला काही जण आहेत. भरजरी आणि डिझाइन पैठणीला अनेक महिलांची पसंती असते. ही साडी तयार करण्यासाठी किमान एक महिन्याचा कालावधी लागतो. ही पैठणी हातावर तयार केली जाते. त्याची लांबी, रुंदी मोठी असते. लग्न, अन्य मोठ्या समारंभासाठी पैठणीलाच महिलांची अधिक पसंती असते. कारागृहात तयार होणारी दुसरी साडी राेजच्या कार्यक्रमात व घरगुती वापरासाठी असते. ती दहा ते पंधरा दिवसांत तयार होते. ही साडी हातावर गुंफल्यामुळे कलाकुसर करायला वेळ लागतो. अनेक ठिकाणी पैठणी मशीनवर तयार होतात. हातावरील पैठणी वेगळ्या पद्धतीची रचनात्मक असते. साधारण साडीची किंमत १० हजार तर भरजरी पैठणी २० हजार रुपये आहे. त्यावर डिझाइन, भरजरी,‌ रंगसंगती, सूत अशी कलाकुसर आहे.

राज्यभरातून मागणी
आमच्या विभागात पैठणी हातावर तयार होते. त्याची कलाकुसर, भरजरी वेगळ्या पद्धतीची आहे. हातावर विणलेल्या साडीला मागणी असते. राज्यासह पंजाबमधून ही मागणी आली आहे. अनेक शोरूममध्ये विक्री पैठणी ठेवण्यात आली आहे. आगाऊ नोंदणी केल्यास तयार करून मिळते. - यू. टी. पवार, अधीक्षक, येरवडा कारागृह पुणे

बातम्या आणखी आहेत...