आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा प्रवासी जखमी:पुलावर खासगी प्रवासी बस उलटली, चालकाचा मृत्यू ; लिंबीचिंचोळीजवळील घटना’

सोलापूर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईहून गुलबर्गाच्या दिशेने जाणारी खासगी प्रवासी वाहतूक बस लिंबीचिंचोळी उड्डाणपुलावर उलटली. या भीषण अपघातात बसचालक ठार झाला. तर सहा प्रवासी जखमी झाले. हा अपघात सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमाराला घडला.मोहम्मद नासिर अहमद मोहम्मद मैनोद्दीन (वय ५३, रा. गुलबर्गा) या बसचालकाचा मृत्यू झाला. निंगम्मा मल्लय्या पुजारी (वय ५४, रायचूर), रुकबीबेगम मकबूल (वय ७७, मुंबई), अमरीश कोडी (वय ३७, चिंचोळी, गुलबर्गा), सतीश कुमार (वय ३५, गोरमेटकल, यादगीर), अप्पाराव कत्ते (वय ६५, खजूरगी, आळंद), अनिल राठोड (वय २२, होळीताळ तांडा, शहापूर यादगीर) हे सहा जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सोलापूरच्या सिव्हिल हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

खासगी बस (केए १ एएम ५१०) लिंबीचिंचोळी पुलावर आल्यानंतर दुभाजकाला ठोकरल्यामुळे पूर्णपणे उलटली. भरधाव वेगात दुभाजकावर बस आदळल्याने चालकाचा ताबा सुटला आणि बस उलटली. जखमींना वळसंग पोलिस आणि महामार्ग मदत केंद्र विभागाने खासगी वाहनातून उपचाराला दाखल केले. यानंतर दुपारी उशिरापर्यंत क्रेनच्या साह्याने बस पुन्हा रस्त्यावरून हटवण्यात आली आहे. पहाटेच्या सुमाराला अपघात झाल्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. खासगी बसमधील काही प्रवासी मुंबईहून गुलबर्गाच्या दिशेने जात होते. जखमींच्या नातेवाइकांना संपर्क करून पोलिसांनी माहिती दिली. सहा जणांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे वळसंग पोलिसांनी सांगितले. या घटनेची प्राथमिक नोंद सिव्हिल पोलिस चौकीत आहे. वळसंग पोलिस आणखी या घटनेचा तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...