आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निरीक्षण:लांबलेला पाऊस, हवामान बदलामुळे स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन लांबले

विनोद कामतकर | सोलापूर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील पाणवठ्यांवर यंदा ऑक्टोबर सरून नोव्हेंबर लागला तरी स्थलांतरित पक्षी फारसे आलेले नाहीत. जिल्ह्यात परतीचा मोसमी पाऊस धो धो बरसला. तर जागतिक पातळीवरील हवामान बदल या कारणांमुळे स्थलांतरित पक्ष्यांचे येणे लांबले असल्याचे निरीक्षण पक्षी अभ्यासकांनी ‘दिव्य मराठी’कडे नोंदवले. सोलापूर परिसरातील हवामान स्थिरावल्यानंतर पक्षी येण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

ख्यातनाम पक्षीतज्ञ डॉ. सलीम अली यांनी सोलापूर हे स्थानिक व स्थलांतरित पक्ष्यांचे माहेर घर अशी उपाधी दिली होती. येथील पाणवठ्यांवर दरवर्षी ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान शेकडो मैलांवरून स्थलांतरित पक्षी मोठ्या संख्येने येतात. सामान्यपणे उजनी जलाशयावर हिवाळी पाहुणे म्हणून पक्षी तीन टप्प्यात येतात. पहिला टप्पा ऑक्टोबरदरम्यान, दुसरा टप्पा डिसेंबरच्या मध्यापर्यंत तर शेवटचा टप्पा डिसेंबरचे शेवट व जानेवारीच्या प्रारंभीचे दिवस.

पहिल्या टप्प्यात ऑक्टोबरच्या सुरुवातीला तुतुवार, नदी सुरय, समुद्र पक्षी (गल पक्षी), मत्स्यगरूड विविध धोबी पक्षी आदी नाना तऱ्हेच्या बदकांचा समावेश असतो. नोव्हेंबरदरम्यान नकेर (नकटा बदक), शेंद्र्या बड्डा (पोचार्ड), काणूक (टील्स), चक्रवाक, पट्टकदंबसरग्या (पिनटेल), बटवा, ससाणे (केस्ट्रल), मत्स्य गरूड, शिखरा (हाॅबी), भोवत्या, मधुबाज (मोहाळ्या, बझर्ड) हे पक्षी दुसऱ्या टप्प्यात येऊन दाखल होतात.

यापैकी बोटावर मोजण्या एवढ्या प्रजातींचे पक्षी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. डिसेंबर व जानेवारीत रोहित (फ्लेमिंगो), पट्टकदंब (बार हेडेड गूज), कलहंस (ग्रे लॅग गूज), चक्रवाक (ब्राह्मणी डक), चिखल बाड्डा (गार्गेनी), श्वेतबलाक, क्रौंच (डोमसाईल व सायबेरियन क्रेन्स), फॅलोरोप हे पक्षी जिल्ह्यातील‌ पाणवठ्यांवर दाखल होतात.

यंदा परतीच्या मोसमी पावसाचे प्रमाणापेक्षा जास्त पडणे आणि अचानक पडलेली थंडी, त्यानंतर लगेच वाढलेले तापमान यामुळे पक्ष्यांच्या आगमनावर परिणाम झालेला जाणवत आहे. एरव्ही ऑक्टोबरमध्ये येणारे गलपक्षी (समुद्र पक्षी) व मत्स्यघार अद्याप आले नाहीत. वातावरण स्थिरावल्यानंतर स्थलांतरित पक्ष्यांची गर्दी वाढेल.’’-डॉ. अरविंद कुंभार, पक्षी अभ्यासक

जिल्ह्यात आतापर्यंत ३२३ प्रजातींच्या पक्ष्यांच्या छायाचित्रांसह नोंदी झालेल्या आहे. त्यापैकी नऊ प्रकारचे पक्षी दुर्मिळ आहेत. हिप्परगा तलावात पाणीपातळी जास्त असल्याने काही पक्षी इतर छोट्या-मोठ्या पाणवठ्यांचा आसरा घेत आहेत. -शिवानंद हिरेमठ, पक्षी अभ्यासक, सोलापूर

बातम्या आणखी आहेत...