आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:चीनकडून मैत्री शाळा आणि वैद्यकीय शिष्यवृत्तीचा प्रस्ताव ; वैद्यकीय सेवेसाठी दवाखाना दत्तक घ्या

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

थोर आंतरराष्ट्रीय मानवतावादी, सोलापूरचे सुपूत्र डाॅ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या प्रेरणेने चीन सरकारकडून नवा प्रस्ताव महापालिकेकडे ठेवण्यात आला आहे. कॅम्प शाळा येथे डाॅ. कोटणीस मैत्री शाळा सुरू करणे आणि सोलापुरातून दोन विद्यार्थ्यांना चीनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी महापालिकेने पाठवणे असा प्रस्ताव चीनच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांना दिला. तर महापालिकेने वेगळा प्रस्ताव त्यांच्यापुढे ठेवला आहे. डाॅ. कोटणीस यांच्या नावाने सोलापुरातील महापालिकेचा दवाखाना दत्तक घेऊन तेथे वैद्यकीय सेवा आणि डायलेसेस सारखे उपचार करावेत, असे प्रस्तावात म्हटले आहे.

चीनच्या तिघा अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ मंगळवारी सोलापुरात आले होेते. आयुक्त शीतल तेली-उगले यांनी त्यांचे स्वागत केले. शिष्टमंडळात काॅग झिनुऑ, लियू मिंग, काॅंग पू यांचा समावेश होता. यावेळी महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त विद्या पोळ, आरोग्य अधिकारी डाॅ. बसवराज लोहारे आदी उपस्थित होते.

चीनच्या शिष्टमंडळाने दिलेले प्रस्ताव असे १ शहरात शिक्षणासाठी शाळा दत्तक घेऊन डाॅ. कोटणीस स्कूल सुरु करुन तेथे शिक्षणांच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करणे यासाठी चीनकडून प्रयत्न केले जाणार आहे. यासाठी कॅम्प शाळा सुचवली आहे.

२ चीन येथे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी सोलापुरातून दोन विद्यार्थीची निवड करुन त्यांना शिष्यवृत्ती देण्याचा प्रयत्न आहे. याबाबत चीन सरकार उत्सुक आहे असे शिष्टमंडळाने सांगितले.

महापालिकेचा मांडला नवा प्रस्ताव डाॅ. कोटणीस यांच्या नावाने महापालिकेचा दवाखाना दत्तक घेऊन तेथून वैद्यकीय सेवा देण्याचा प्रयत्न करावे. ते सार्थक असेल. त्यांच्या नावाने सोलापुरातील दवाखाना दत्तक घ्यावे असा प्रस्ताव दिल्याची माहिती आयुक्त शीतल तेली-उगले यांनी दिली. याबाबत आम्ही चर्चा करुन कळवू असे चीन शिष्टमंडळाने सांगितल्याची माहिती आयुक्तांनी दिली.

शिजाज्वांग व सोलापूर शहरात भगिनी करार डाॅ. कोटणीस यांची जन्मभूमी सोलापूर. तर आहुतीभूमी शिजाज्वांग (चीन) आहे. या दोन्ही शहरात सांस्कृतिक, सामाजिक देवाण-घेवाणीसाठी भगिनी करार झाला आहे. त्याअंतर्गत चीन सरकारपकडून डाॅ. कोटणीसांच्या स्मारकसाठी मदत केली गेली. यातूनच आता नवा प्रस्ताव आला आहे. डाॅ. कोटणीस यांनी चीन-जापान युद्धात भारताकडून मदतीसाठी चीनला गेलेल्या वैद्यकीय पथकात डाॅ. कोटणीस यांचा समावेश होता. सैनिकांना वैद्यकीय सेवा देत असतानाच त्यांचा ३२ व्या वर्षी मृत्यू (१९४२) झाला होता.

बातम्या आणखी आहेत...