आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध विकासाची व लोकोपयोगी कामे होत आहेत. सन २०२३-२४ साठी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना आणि आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनांसाठी जवळपास ७४५ कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध क्षेत्रात चांगली प्रगती करत सोलापूर जिल्ह्याची विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले. महाराष्ट्र राज्याच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस कवायत मैदान येथे मुख्य शासकीय ध्वजारोहणानंतर दिलेल्या शुभेच्छा संदेशात ते बोलत होते.
यावेळी महापालिका आयुक्त शीतल तेली उगले, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस आयुक्त राजेंद्र माने, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) शिरीष सरदेशपांडे, सहाय्यक जिल्हाधिकारी मनिषा आव्हाळे, अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, संदीप कोहिणकर, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार उपस्थित होते. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली. राष्ट्रगीत व राज्यगीत धून वादन झाले. त्यानंतर परेड निरीक्षण व परेड संचलन करण्यात आले.
परेड संचलनात राज्य राखीव पोलीस बल, जलद प्रतिसाद पथक, गृहरक्षक दल, पोलीस विभाग महिला व पुरूष पथक, शहर वाहतूक शाखा, सोलापूर शहर वाद्यवृंद पथक यांच्यासह आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त चित्ररथ, रुग्णवाहिका यांनी सहभाग नोंदवला. जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या हस्ते पोलीस महासंचालक पदक विजेते शहराचे पोलिस उपायुक्त अजित बोराडे, शहर गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनील दोरगे, ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुहास जगताप, सहायक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर यांच्यासह २९ पोलीस अधिकारी कर्मचारी यांना पदक प्रदान करण्यात आले. तसेच राज्य शासनाच्या सेवेत निवड झालेल्या १० उमेदवारांना प्रातिनिधीक स्वरूपात नियुक्तीपत्रे देण्यात आली. सूत्रसंचालन पोलीस कॉन्स्टेबल मलकप्पा बणजगोळे यांनी केले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.