आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआषाढी वारी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या महिला वारकऱ्यांची आरोग्यासह, त्यांच्या वैयक्तिक सोयी-सुविधांसाठी प्रशासन दक्ष आहे. यंदाच्या वर्षी विशेष उपाययोजना राबवण्यावर भर देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. आषाढी वारी सोहळ्यात सहभागी महिला वारकऱ्यांना चांगल्या सोयी-सुविधा मिळाव्यात, यासंदर्भात महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी प्रशासनाला सूचना दिल्या होत्या.
आषाढी वारी सोहळा सोलापूर जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर मार्गावरील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये स्त्री रोग तज्ञांचे विशेष पथक नियुक्त करण्यात येणार आहे. तसेच, पालखी मार्गावर उभारण्यात येणाऱ्या सार्वजनिक शौचालयांपैकी ४० टक्के शौचालये महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये सॅनिटरी नॅपकीन मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतील. त्या विघटन करण्यासाठी मार्गावर ५० ठिकाणी मशिन बसवण्यात येणार आहेत. स्तनदा मातांसाठी बाळांना दूध पाजण्यासाठी तात्पुरता निवारा शेड पालखी मार्गावर विसावाच्या ठिकाणी असेल.
वाळवंटात उभारणार चेंचिंग रूम
वारकरी महिलांना त्यांच्या वैयक्तिक, आरोग्य विषयक अडचणी मांडण्यासाठी संकोच वाटू नये, यासाठी प्रत्येक आरोग्य केंद्रांमध्ये प्रामुख्याने महिला वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. चंद्रभागा नदीच्या वाळवंटामध्ये स्नानानंतर महिलांना कपडे बदलण्यासाठी ‘चेगिंगरुम’ उभारण्यात येणार आहेत. तसेच, वाळवंट परिसरात महिलांसाठी सार्वजनिक शौचालय युनिट असतील, असेही मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.