आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्रद्धांजली:पं. गुलाम दस्तगीर बिराजदार यांनी पवित्र कुरआनचे संस्कृतमध्ये भाषांतर पूर्ण केले; लॉकडाऊननंतर हाेणार हाेते प्रकाशन

सोलापुर / राजेंद्र भोसले15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोलापुरातील संस्कृत भाषा पंडित-साहित्यिकाने घेतला जगाचा निरोप

संस्कृत पंडित गुलाम दस्तगीर गेल्याची बातमी त्यांचा मुलगा, माझा मित्र बद्दीउज्जमा यांच्याकडून समजली आणि धक्काच बसला. मला मिळालेल्या त्यांच्या सहवासातील आठवणींचा पट डोळ्यांसमोर उभा राहिला. शिवप्रज्ञा प्रकाशनाच्या त्यांच्या संस्कृत पुस्तकनिर्मितीच्या निमित्ताने मला त्यांचा दीर्घ सहवास लाभला आणि त्यामुळे त्यांच्या विशाल व्यक्तिमत्त्वाची प्रचिती आली. साधी राहणी, पांढरा शर्ट, विजार व डोक्यावर काळी टोपी. अतिशय विनम्र व सालस व्यक्तिमत्त्व. बोलण्यात विनयशीलता, चेहऱ्यावर तेज, आत्मविश्वास आणि तरुणांना लाजवेल असा उत्साह होता. त्यांच्या या गुणांमुळे मी प्रभावित झालो. पंडितजींचे संस्कृत प्रेम व कार्य एखाद्या महामेरूपेक्षा कमी नाही.

मुस्लिम धर्मात जन्म आणि मातृभाषा मराठी नसतानाही त्यांनी केलेली संस्कृतसेवा अचंबित करणारी आहे. त्यांनी आपल्या नातवाच्या विवाहाची पत्रिकाही मराठी, हिंदी व संस्कृत या तीन भाषांत छापून संस्कृतवरील आपले प्रेम व्यक्त केले होते. पंडितजींचा जन्म २४ ऑगस्ट १९३५ ला अक्कलकोट तालुक्यातील चिक्केहळी या एका छोट्याशा गावात झाला. त्यांचे शालेय शिक्षण अक्कलकोट येथे झाले. लहानपणी गरिबीमुळे त्यांना खूपच संघर्ष करावा लागला. छोटी-मोठी अंगमेहनतीची कामे करून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. प्रसंगी एसटी स्टँडवर हमालीही केली. संस्कृत विषयात त्यांनी एमए पूर्ण केले. शहाजी हायस्कूल येथे ते संस्कृत विषयाचे शिक्षक म्हणून रुजू झाले. नोकरी करीत असतानाही त्यांची संस्कृत साहित्य निर्मिती अखंड सुरू होती. संस्कृतमध्ये त्यांनी ‘पंडित’ ही अत्युच्च पदवी संपादन केली. ‘आदर्श शिक्षक’ म्हणून त्यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव झाला. सेवानिवृत्तीनंतरही ते स्वस्थ बसले नाहीत. संस्कृत मासिके, साप्ताहिके, मासिके, त्रैमासिके यांचे संपादन केले. हजारो लेख लिहिले. शेकडो व्याख्याने दिली. त्यांना संस्कृत भाषेतील अनेक नामांकित संस्थांनी व विद्यापीठांनी ‘महापण्डित’, ‘पण्डितेन्द्र’ ‘संस्कृतरत्नम्’, ‘परशुरामश्री’, ‘विद्यापारंगत’, ‘वाचस्पती’ या पदव्यांनी गौरविले आहे. राज्य, राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावरील अनेक पुरस्कार मिळाले.

आम्हां पती-पत्नीला संस्कृत भाषा येत नसल्याने सुरुवातीच्या काळात टंकलेखनाच्या चुका भरपूर होत. ते आम्हा उभयतांना न दुखावता हसत-हसत चुका सांगत. आमच्या प्रकाशनाच्या कार्यपद्धतीवर खुश होऊन त्यांनी अक्कलकोट येथे एका कार्यक्रमात आमचा सत्कार आयोजित केला. रीतसर पत्र देऊन पत्नीसाठी दोन हजार रुपयांची साडी भेट दिली आणि येण्या-जाण्याचा खर्च देऊन आमचा यथोचित सन्मान केला. हे त्यांनी दिलेले प्रेम कधीही विसरता येणार नाही.

एक हजार पानी कुराणच्या संस्कृत अनुवादाचे काम ते अखेरच्या काळात करत होते. दिवसातील बारा ते चौदा तास लेखनाचे काम करत राहिले. हातात मोठे भिंग घेऊन रात्रीच्या रात्री जागरण करत. ग्रंथ पूर्णत्वास आला होता. फक्त शेवटचे मनोगत बाकी राहिले होते. त्यापूर्वीच त्यांना या जगातून जावे लागले. १५ ऑगस्ट २०२१ ला मान्यवरांच्या हस्ते या एक हजार पानी महाग्रंथाचे प्रकाशन करण्याचा संकल्प त्यांनी केला होता. तो दुर्दैवाने पूर्ण होऊ शकला नाही, याचे शल्य सर्वांनाच बोचत राहील. आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी संस्कृत भाषेच्या सेवेसाठी समर्पित केले. तन, मन व धनाने अखेरपर्यंत संस्कृतसेवा केली. त्यांची वाणी, लेखणी, आचार-विचार संस्कृत भाषेत पूर्णपणे विरघळले होते. एका महान संस्कृत महामेरूचे जाणे ही या भाषेची खूप मोठी हानी आहे. अशा या सारस्वताच्या चरणी मी नम्रपणे माथा टेकतो. त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी, ही प्रार्थना.

पंडितजींची वाणी, लेखणी, आचार-विचार संस्कृतमध्ये विरघळले होते...
साेलापूर येथील ज्येष्ठ साहित्यिक व संस्कृत पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार (८७) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा गझलकार बद्दीउज्जमा बिराजदार, दाेन मुली, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे. पवित्र कुरआनचे संस्कृतमध्ये भाषांतर करण्याचे कठीण काम पं. बिराजदार यांनी पूर्ण केले आहे. लॉकडाऊननंतर त्याच्या प्रकाशनाचे नियोजन होते. मात्र तत्पूर्वीच त्यांचे निधन झाले. साहित्यिक, प्रकाशक राजेंद्र भोसले यांनी पंडितजींच्या आठवणींना दिलेला उजाळा.

बातम्या आणखी आहेत...