आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजुनी पेन्शन हा विषय मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री, ग्रामविकास मंत्री यांची संयुक्त बैठक घेऊन या बैठकीला मी स्वतः उपस्थित राहणार आहे. राजस्थान, छत्तीसगड या राज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये ही योजना लागू करता येते का ? याबाबत गंभीरपणे चिंतन करून हा प्रश्न निकाली काढण्यात येईल असे आश्वासन राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दिले.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन पनवेल येथे कर्नाळा स्पोर्ट क्लब पनवेल येथे शुक्रवारी पार पडले. याप्रसंगी खासदार पवार बोलत होते. या अधिवेशनात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शिक्षकांच्या अनेक मागण्यांवर घोषणा केल्या, अशी माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे मनपा, नगर पालिका सरचिटणीस संजय चेळेकर यांनी दिली.
ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, एकल, पती-पत्नी, विस्थापित शिक्षकांच्या सोयीसाठी बदली धोरणात आवश्यक दुरुस्ती करण्यासाठी संभाजीराव थोरात यांच्या शिष्टमंडळासोबत स्वतंत्र बैठक घेण्यात येईल.
मुख्यालयी राहण्याबाबतचा शासन निर्णय बदलण्यात येईल, मात्र शिक्षकांनी शालेय कामकाजात वेळेवर उपस्थित राहावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच १०-२०-३० ही आश्वासित योजना लागू करण्यासाठी अर्थ विभागाकडे पाठपुरावा करण्यात येईल अशीही घोषणा त्यांनी केली.
वेतन त्रुटी दूर करण्यासाठी हालचाली
२००४ नंतर सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांच्या वरिष्ठ वेतन श्रेणीमधील वेतन त्रुटी दूर करण्यासाठी तसेच सातव्या वेतन आयोगातील पदवीधर व मुख्याध्यापकांचे वेतन त्रुटीसाठी बक्षी समितीचा खंड २ लवकर प्रकाशित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. संगणक परीक्षेसाठी मुदतवाढ देण्यात येईल व वसुली केलेली वेतनवाढीची रक्कम परत देण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, कॅशलेस विमा योजना सुरू करण्यात येईल तसेच केंद्रप्रमुखांची पदे शिक्षकांमधून भरण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन मुश्रीफ यांनी दिले .
राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील म्हणाले, प्राथमिक शिक्षक हा शिक्षण क्षेत्राचा पाया असून आमचे सहकारी हसन मुश्रीफांच्या शिक्षक हिताच्या प्रस्तावांना मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पाठिंबा दिला जाईल.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील, माजी अध्यक्ष सुनील तटकरे, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे,निलेश लंके, उमेश पाटील ,संभाजीराव थोरात यांच्यासह राज्यसंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
सर्व शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीचे अध्यक्ष मधुकर काठोळे यांचा शिक्षक संघांमध्ये प्रवेश जयंत पाटील व संभाजीराव थोरात यांच्या शुभ हस्ते घेण्यात आला, या कार्यक्रमात स्वागत शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांनी व प्रास्ताविक प्रदेशाध्यक्ष अंबादास वाझे यांनी केले. आभार प्रदेश सरचिटणीस आबासाहेब जगताप यांनी मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.