आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेनेच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ''राज ठाकरे यांचा राजकीय गेम होऊ शकतो'' असा दावाही त्यांनी केला आहे.
नीलम गोऱ्हे आज सांगलीत बोलत होत्या. यापूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही भाजपने राज ठाकरे यांचा बळी घेतला असा गंभीर आरोप केला होता.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी गुढी पाडवा मेळाव्यात हिंदुत्ववादी भूमिका घेतली आहे. यानंतर शिवसेना विरुद्ध मनसे असा वाद दिसून आला. मात्र राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेनंतर अनेक महाराष्ट्र सैनिकांनी मनसेला कायमचा जय महाराष्ट्र केला आहे. यामुळे भाजपकडून राज ठाकरेंचा राजकीय बळी घेतला गेला असा टोला लगावण्यात आला होता, असा आरोप संजय राऊतांनी केला होता. यानंतर आता नीलम गोऱ्हे यांनी भाजपमुळे राज ठाकरेंचा राजकीय गेम होणार, असे वक्तव्य केले आहे.
नेमके काय आहे प्रकरण?
सांगलीत बोलताना गोऱ्हे म्हणाल्या की, राज ठाकरे यांचा राजकीय गेम होऊ शकतो. राजकीय गेम म्हणजे त्यांच्यावर भाजप राजकीय कुरघोडी करू शकते. राज ठाकरे भाजपबद्दल अनुकूल भूमिका घेत आहेत. पण भाजप काम झाले की राज ठाकरे यांना वाऱ्यावर सोडून देईल. आम्हाला भाजपचा अनुभव आहे, टिकीट वाटपाची वेळ आली की भाजप मनसेला दूर करेल असेही त्यांनी म्हटले आहे. भाजपला उत्तर भारतीयांची मते हवी असतात. त्यामुळे ते राज ठाकरेंना वेळेवर दूर सारत त्यांचा राजकीय गेम करतील असा दावा गोऱ्हेनी केला आहे.
केंद्राकडून सुरक्षा पुरवण्यावरुनही केली टीका
जे उद्धव ठाकरेंवर टीका करतील त्यांना उज्वला योजनेसारखे वाय सुरक्षा मिळते. केंद्र सरकारने ही एक सुरक्षा योजना सुरू केली असावी, असा जोरदार टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे. नवनीत राणा अजून राजकारणात नव्या आहेत, त्यांना राजकारण समजायला वेळ लागेल. लंका कुठे आहे, लंकेत काय सुरू आहे, तिथे लोक पंतप्रधानाच्या मागे लागले आहेत. हे राणांना माहित नाही. मुंबई शिवसेनेची आहे आणि शिवसेना मुंबईची हे समीकरण कदाचित त्यांना माहिती नाही असेही त्या म्हणाल्या. तर राज ठाकरे अनेकदा नवनवीन प्रयोग करत असतात, त्यामुळे त्यांना महत्व देण्याची गरज नाही. असेही त्यांनी म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.