आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एफआरपी दिल्याशिवाय कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही:राजू शेट्टी यांचा सोलापुरात साखर कारखानदारांना इशारा

सोलापूर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील हंगामातीलच एफआरपी थकीत असताना चालू गळीत हंगाम तोंडावर आला. मागील एफआरपी दिल्याशिवाय चालू गळीत हंगामाचे धुराडे पेटू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज सोलापुरात दिला.

चालू गळीत हंगाम आणि थकीत एफआरपी या विषयावर त्यांनी सोमवारपासून राज्याच्या दौऱ्याला सुरुवात केली. सोमवारी सोलापुरात दाखल झाले. शासकीय विश्रामगृहात माध्यमांशी बोलताना त्यांनी साखर कारखानदारीच्या एकूणच कारभारावर बोट ठेवत केंद्र आणि राज्य सरकारदेखील त्यांच्याच पाठीशी असल्याचा आरोप केला. शेतकऱ्यांसाठी कायदा करून त्यांना वाऱ्यावर सोडले. त्यामुळे आता संघर्ष अटळ असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

मागील गळीत हंगामातील थकीत एफ आर पी 900 कोटी रुपये इतके आहे. त्याच्या वसुलीची जबाबदारी ही शासनाची असताना शासकीय यंत्रणेने त्याकडे गांभीर्याने पाहिले नाही. सरकार आणि प्रशासन हे एक झाल्याचे द्योतक आहे. मग शेतकऱ्यांचा वाली कोण? ऊस उत्पादकासमोर आज अनेक समस्या आहेत. कारखानदारांची पाचही बोटे तुपात आहेत. उसाच्या वजनात काटामारी करून प्रचंड पैसा कमवायचा आणि शेतकऱ्यांना ठेंगा दाखवायचा अशीही कारखानदारी. त्यावर कोणाचेच नियंत्रण नाही. शेतकऱ्यांच्या श्रमावर मोठी झालेली ही मंडळी राजकीय निर्णय प्रक्रियेत सहभागी होतात. त्यामुळे त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही.

एकरकमी एफआरपी चा कायदा केंद्राने केला. परंतु महाविकास आघाडीने केंद्राच्या संमतीशिवाय त्यात दुरुस्ती करून पहिला हप्ता 14 दिवसांनी आणि उर्वरित रक्कम गाळपानंतर अशी तरतूद केली. ही तरतूद कारखानदारांच्या बाजूने आहे. त्याच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. त्यावर लवकरच निर्णय होईल, अशी माहिती श्री. शेट्टी यांनी यावेळी दिली.

काटामारीतून चार हजार कोटी कमावतात. आणि 220 कोटींचा जीएसटी चुकवत असल्याकडेही श्री शेट्टी यांनी लक्ष वेधले. याबाबत जीएसटी यंत्रणेला साखर गोदामांमध्ये अचानक छापा घालण्याचा आणि तपासणी करण्याविषयी सांगितले आहे. परंतु अद्यापही यंत्रणा आलेली नाही, असेही श्री शेट्टी यांनी यावेळी नमूद केले.

बातम्या आणखी आहेत...