आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईद:रमजान ईद आज, ईदगाह मैदानावर तयारी

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवारी रमजानचे तीस रोजे पूर्ण झाले आणि सायंकाळी चंद्रदर्शन झाले. चंद्रदर्शन झाल्यामुळे उद्या मंगळवारी रमजान ईद साजरी होणार असल्याचे शहर काझी मुफ्ती सय्यद अमजदअली काझी यांनी जाहीर केले.

चंद्रकोर दिसताच प्रत्येकांनी एकमेकांनी गळाभेट देत शुभेच्छा दिल्या. महिलांना आपापल्या घराच्या गच्चीवरून चंद्राचे दर्शन घेतले. तीस रोजे पूर्ण झाल्यामुळे महिलांनी दुपारपासूनच ईदची तयारी सुरू केली होती. सुखा मेवा कापून ठेवणे अथवा गुलगुले करणे ही कामे दुपारपासून सुरू झाली होती. शहरातील पाचही ईदगाह मैदानात महापालिकेने शनिवारपासून स्वच्छता केली होती. उर्वरित स्वच्छता सोमवारी पूर्ण करण्यात आली.

होटगी रोड येथील आलमगीर ईदगाहच्या आवारात दोन वर्षापूर्वी झाडे लावण्यात आली होती. त्याचे योग्य पध्दतीने संगोपन झाल्यामुळे आज ही झाडे चार ते पाच फुट उंच झाली आहेत. त्यामुळे चारही बाजूने सावली येत आहे. नमाज अदा करतानासुध्दा या सावलीचा लाभ होईल.

ईदची नमाज होताच शिवसैनिक देणार मुस्लिम बांधवांना शुभेच्छा
जातीय सलोखा राखण्यासाठी शिवसेनेने यंदा पुढाकार घेतला आहे. उद्या रमजान ईदची नमाज होताच प्रत्येक मशिद आणि ईदगाहसमोर शिवसैनिक गुलाब पुष्प देऊन मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देणार आहेत, अशी माहिती जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी दिली. हिंदू-मुस्लिम समाजात भाईचारा अबाधित रहावा यासाठी काही सामाजिक संघटना आणि राजकीय पक्ष प्रयत्न करीत आहेत. त्यातच यंदा शिवसेनेही पुढाकार घेतला आहे. सर्वधर्मीय बांधव एकत्र असतील तरच समाजाचा विकास शक्य आहे. महाराष्ट्रात सर्वजण गुण्यागोविंदाने रहावे हे प्रत्येक व्यक्तीला वाटत असते. कोणालाही वाद-विवाद नको असतो. यंदा प्रथमच शिवसेनेने पुढाकार घेतला आहे. उद्या ईदची नमाज अदा केल्यानंतर प्रत्येक मशिदीसमोर आणि ईदगाह समोर शिवसैनिक जातील आणि मुस्लिम बांधवांना पुष्पगुच्छ देऊन ईदच्या शुभेच्छा देतील.

मुस्लिम बांधवांना दूध वाटप
शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बरडे हे गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या प्रभागातील मुस्लिम कुटुंबीयांना दुधाचे वाटप करतात. यंदाही प्रत्येक मुस्लिम कुटुंबीयांना पाच लिटर दुधाचे पाकीट देण्यात आले. त्या पाकिटावर छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र होते. प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांना शुभेच्छा देऊन शिस्तबध्दतेने दुधाच्या पाकिटाचे वाटप करण्यात आले.

रमजान ईदनिमित्त मुस्लिम बांधवांनी दूध खरेदीसाठी मोठी गर्दी केली. जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघ दूध पंढरीतर्फे दूध विक्री व्यवस्था करण्यात आली. यात सात रस्ता, नईजिंदगी, समाचार चौक, अशोक चौक, मौलाली चौक, जोडबसवण्णा चौक, अक्कलकोट रोड आदी १२ ठिकाणी दुधाचे टँकर उपलब्ध करून देण्यात आले. त्याशिवाय विविध प्रमुख केंद्रावर दुधाची उपलब्धता झाली. १० ते १५ हजार लिटरचे दुधाचे टँकर होते. शहरात सुमारे २ लाख लिटर दुधाची विक्री होती.

सात रस्ता दूध विक्री केंद्र येथील दूध पंढरीचे वरिष्ठ पर्यवेक्षक प्रशांत काळे म्हणाले, चेअरमन रणजित शिंदे, व्यवस्थापक नितीन बंडकर, सर्व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात टँकरद्वारे दूध विक्री व्यवस्था करण्यात आली. सुमारे १२ ठिकाणी दुधाच्या टँकरद्वारे विक्री व्यवस्था आहे. याद्वारे स्वच्छ व ताज्या निर्भेळ दुधाची उपलब्धता दूध संघाने करून दिली. ४८ रुपये प्रती लिटर दुधाचा दर आहे.

बातम्या आणखी आहेत...