आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:ग्लोबल टीचर पुरस्कारप्राप्त बार्शीचे रणजितसिंह डिसले गुरुजींची जागतिक बँकेच्या शिक्षण सल्लागारपदी निवड

बार्शी18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण उपक्रमांतून शिक्षक घडवण्याचे लक्ष्य

येथील जागतिक स्तरावरील ग्लोबल टीचर पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षक रणजितसिंह डिसले गुरुजी यांची जागतिक बँकेच्या शिक्षणविषयक सल्लागारपदी निवड करण्यात आली आहे. जून २०२१ ते जून २०२४ दरम्यानच्या कालावधीसाठी ही निवड करण्यात आली. डिसले गुरुजी यांच्यावर जागतिक बँकेची जबाबदारी आल्यामुळे त्यांचे योगदान हे जगाला दिशा देणारे ठरेल. नावीन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून शैक्षणिक क्रांती आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर हाेण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. गावपातळीपासून जागतिक पातळीपर्यंतच्या अनुभवसंपन्नतेमुळे डिसले गुरुजींची सल्लागारपदी सार्थ निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह जगभरातील शिक्षण क्षेत्रातील अनेक तज्ज्ञांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.

बार्शीतील संशोधक रणजितसिंह डिसले गुरुजी यांना जगातील सर्वोच्च सन्मानाचा ७ कोटी रुपयांचा ग्लोबल टीचर हा पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांनी पुरस्कारातील आर्धी रक्कम ९ देशांतील शैक्षणिक संशोधनकार्यासाठी आणि उर्वरित रक्कम देशातील शैक्षणिक उपक्रमांना चालना देण्यासाठी, शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी जाहीर केली होती. लॉकडाऊनमुळे वॉर्की संस्थेने त्यांचे सन्मानचिन्हदेखील घरपोच पाठवले होते. अत्यंत खडतर परिश्रम करुन सर्वोच्च बहुमानाची संपूर्ण रक्कमही त्यांनी समाजाच्या प्रगतीसाठी देऊन नि:स्वार्थ सामाजिक जाणिवेचा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.

यासाठी करण्यात आली निवड
जागतिक बँकेच्या माध्यमातून जगभरातील शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी ग्लोबल कोच हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाद्वारे मुलांची शैक्षणिक संपादणूक पातळी वाढवणे, शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षणात एकसूत्रता आणणे, शिक्षकांना कालसुसंगत प्रशिक्षण देणे, शिक्षकांमधील नेतृत्वगुण विकसित करणे यासाठी जागतिक बँकेने १२ सदस्यांची समिती स्थापन केली आहे. तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण उपक्रमांतून २१ व्या शतकातील शिक्षक घडवण्यासाठी भारतातील रणजितसिंह डिसले गुरुजी यांची निवड जागतिक बँकेने केली आहे.

बातम्या आणखी आहेत...