आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजपकडून युतीसाठी फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने नाराज झालेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढून भाजपला त्यांची जागा दाखवून देण्याचा रोडमॅप तयार केला आहे. त्यासाठी त्यांनी अर्थपूर्ण तयारी केली आहे. एका कार्यक्रमात रासप कार्यकर्त्यांनी त्यांच्या गळ्यात २ लाख ५५ हजार रुपयांच्या नोटांचा हार घालून सत्कार केला. २०० विधानसभा मतदारसंघांतील कार्यकर्त्यांकडून पक्षासाठी ५ लाखांचा निधी मिळाल्याची माहिती जानकर यांनी दिली. २०१४मध्ये त्यांनी बारामतीतून सुप्रिया सुळे यांच्याविरोधात लोकसभा निवडणूक लढवली. ६९ हजार ७१९ मतांनी ते पराभूत झाले असले तरी त्यांनी सुळे यांना जोरदार टक्कर दिली होती.
फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये जानकर यांचा पक्ष सहभागी होता. त्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली. मंत्रिपदही मिळाले होते. पण फडणवीस सरकार गेले. जानकरांचा आमदारपदाचा कार्यकाळ संपला. तत्पूर्वीच रासप आणि भाजपमध्ये दुरावा निर्माण झाला. हा दुरावा आता ठळकपणे नुकत्याच झालेल्या पक्षाच्या कार्यक्रमात जाणवत आहे. तेथे जानकर म्हणाले, आगामी महापालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी आम्ही केली आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीला थोडा उशीर असला तरीही आमची पक्षबांधणी सुरू आहे. राज्यात ९० हजार मतदान बूथ आहेत. त्यापैकी ३० हजार बूथपर्यंत आम्ही पोहोचलो आहोत. ६० हजार मतदान बूथवर पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे.
रासपचे आक्रमक मिशन
इलेक्शन ‘आपल्या चौकात आपली औकात’ हे मिशन ठरवून कार्यकर्ते कामाला लागले आहेत. भाजप असो वा काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांचा पक्ष, निवडणुकीत युती अथवा आघाडीसाठी आम्हाला सोबत घ्या, म्हणून आम्ही त्यांच्या मागे जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
चार राज्यांत मिळाली पक्षाला मान्यता
राष्ट्रीय समाज पक्षाला आज चार राज्यांमध्ये मान्यता मिळाली आहे. गुजरातमध्ये रासपचे ४० नगरसेवक आहेत. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत ११० उमेदवार उभे होते. त्यातील एकही निवडून आला नसला तरी मतांची टक्केवारी वाढली आहे. बंगळुरूमध्ये उमेदवार उभा केल्याचे त्यांनी सांगितले.
शेट्टींप्रमाणे जानकरांचेही एकला चलो रे धोरण
गेल्या आठवड्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा, माजी खासदार राजू शेट्टी यांनी आगामी निवडणुकीत कुणाशीही युती करणार नाही. स्वबळावर लढणार असल्याचे घोषित केले. शेट्टींप्रमाणे जानकरांचीही ‘एकला चलो रे’ची तयारी दिसते. जानकर यांनी मविआतून बाहेर पडल्यास उद्धवसेनेशी युतीची तयारी केली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.