आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील रेशन दुकानांना कॉमन सर्व्हिस सेंटरचा दर्जा देण्यात आला असून लवकरच सातबारा उतारा, उत्पन्नाचा दाखला, मोबाइल रिचार्ज, रेल्वेच्या तिकिटांसह ५० पेक्षाही अधिक सुविधा मिळणार आहेत, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे यांनी दिली. रेशन दुकानदारांचे जीवनमान उंचवावे, तुटपुंज्या कमिशन व्यतिरिक्त शासनाच्या नवीन उपक्रमाने उत्पन्नात भर पडावी, यासाठी रास्त भाव धान्य दुकानातून ग्राहकांना गहू, तांदूळ, साखर या जीवनावश्यक वस्तूंबरोबर राज्य शासनातर्फे (सीएससी) कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून गरजेच्या सुविधा मिळणार आहेत. ही सुविधा देण्यासाठी दुकानदारांना ऑनलाइन कार्यपद्धती पूर्ण करणे आवश्यक आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील सर्व दुकानदारांनी नोंदणी पूर्ण केली असल्याने त्या तालुक्यामध्ये लवकरच सेंटर सुरू होईल. दुकानदारांना त्याबाबतच्या प्रमाणपत्रांचे वितरण नुकतेच झाले. यावेळी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे संपर्क प्रमुख नितीन पेंटर, तालुकाध्यक्ष महादेव कदम, जिल्हा संघटक अनिल जमदाडे, शिवाजी टोणपे, उपाध्यक्ष आदिनाथ कांबळे आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात एक हजार ८५४ रेशन दुकाने आहेत. त्यापैकी सोलापुरात ३१४ दुकाने आहेत. सर्वच रेशन दुकानांना कॉमन सर्व्हिस सेंटरचा दर्जा देण्यात येईल. यासाठी रेशन दुकानदारांना नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. अनेक दुकानांना आयएसओ मानांकन मिळाले आहे. त्या दुकानदारांनी संगणक, इंटरनेट सुविधा घेतली आहे. दुकानदारांना लवकरच प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे, सहायक पुरवठा अधिकारी विवेक साळुंके यांनी सांगितले.
राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ही पद्धत लवकरच लागू होणार काळाबाजार थांबणार अनेक वेळा स्वस्त धान्य दुकानांतील माल काळ्या बाजारात विक्रीसाठी जाताना पकडला जातो. सर्वसामान्यांपर्यंत तो माल पोहोचत नाही. त्याला रेशन दुकानदारांना मिळणारे तुटपुंजे कमिशन हे देखील एक कारण आहे. त्यामुळे काही दुकानदार चुकीचे काम करत होते. आता त्यांना सीएससीच्या माध्यमातून पर्यायी उत्पन्नाचा स्रोत मिळणार असल्याने धान्याचा काळा बाजार थांबेल. यात सर्वसामान्य नागरिकांचा सर्वाधिक फायदा होणार आहे.
महा ई-सेवा केंद्राप्रमाणे सुविधा ^शहर व ग्रामीण भागातील रेशन दुकानांमधून महा ई-सेवा केंद्राप्रमाणे रेशन दुकानांमधून सेवा-सुविधा मिळतील. लोकांची चागंली सोय होणार असून रेशन दुकानदारांना त्याचा लाभ होणार आहे. १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनापासून वडाळा येथून सुरुवात होणार आहे. टप्प्याटप्याने सर्व दुकानांमध्ये सीएससी सुविधा सुरू होईल. - वर्षा लांडगे, जिल्हा पुरवठा अधिकारी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.