आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविधान मंडळाची पंचायतराज कमिटी बुधवारपासून (दि.१५) जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्याच्या स्वागतासाठी जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये रेडकार्पेट अंथरण्यात आले आहे. यशवंतराव चव्हाण सभागृहात फुलांची सजवाट, रंगरंगोटीसह, समिती सदस्यांना राहण्यासाठी हॉटेलमध्ये सोय, दौऱ्यासाठी वाहनांचा ताफा तैनात ठेवला आहे. प्रशासकीय कामांचे लेखापरीक्षण, आक्षेपांवर साक्ष घेण्यात येणार आहे. पंचायतराज समितीचे अध्यक्ष आमदार संजय रायमुलकर यांच्यासह समितीचे सदस्य असलेले ३२ आमदार हे १५ ते १७ जूनपर्यंत जिल्हा परिषदेत आढावा, मुख्य कार्यकारी अधिकारी यांची साक्ष घेणार आहेत. यावेळी समितीकडून जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय कामांचे ऑडिट करण्यात येणार आहे. या शिवाय समितीचे सदस्य ग्रामीण भागातील ग्रामपंचायती, प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळांनाही भेट देणार आहेत. दौऱ्याच्या निमित्ताने मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी सर्व खातेप्रमुखांकडून पंचायतराज समितीसाठी आवश्यक माहिती संकलित केली आहे. गुरुवार व शुक्रवार या दोन्ही दिवशी ग्रामीण भागातील आरोग्य केंद्र, शाळा, ग्रामपंचायत यांची पाहणी करण्यात येणार आहे. आमदार, खासदार व लोकप्रतिनिधीं यांनाही समितीकडून भेटण्यासाठी वेळ देण्यात आली आहे. शुक्रवारी जिल्हा परिषदेचे माजी पदाधिकारी, सदस्य समितीच्या सदस्यांची भेट घेणार आहेत. यावेळी प्रशासनातील काही विषयांवर समितीसमोर निवेदन सादर करण्यात येणार आहे.
शासकीय दौऱ्यावरील समितीसाठी लाखो रुपयांचा खर्च कशासाठी : पाच वर्षांपूर्वी पंचायत राज समिती सोलापूरच्या दौऱ्यावर आली होती. त्यावेळी पाहुणचार, स्वागत सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च झाला आहे. काही विभागांसह, कर्मचाऱ्यांकडून सक्तीने वर्गणी वसूल केल्याच्या तक्रारी सर्वसाधारण सभेत सदस्यांनी केल्या होत्या. शासकीय दौऱ्यासाठी आलेल्या समितीसाठी लाखो रुपयांच्या खर्चाची गरज काय? त्या संपूर्ण खर्चाचा हिशेब सादर करण्याची मागणी तत्कालीन सदस्यांनी केली होती. पण, नंतर त्या सदस्यांसह, प्रशासनाने तो विषय गुंडाळला होता. यावेळीही शासकीय दौऱ्यावर आलेल्या समितीच्या स्वागत, व्यवस्थेसाठी प्रशासन किती खर्च करीत आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
हे आहेत समितीचे सदस्य... : समिती प्रमुख संजय रायमुलकरसह आमदार सदस्य प्रदीप जैस्वाल, कैलास पाटील, राहुल पाटील, अनिल पाटील, संग्राम जगताप, दिलीपराव बनकर, शेखर निकम, सुभाष धोटे, माधवराव पवार, प्रतिभा धानोरकर, हरिभाऊ बागडे, डॉ. विजयकुमार गावीत, डॉ. देवराव होळी, कृष्णा गजबे, विजय रहांगडाले, राणा जगजितसिंह पाटील, प्रशांत बंब, मेघना बोर्डीकर-साकोरे, किशोर जोरगेवार, अंबादास दानवे, विक्रम काळे, अमरनाथ राजूरकर, निरंजन डावखरे, सुरेश धस, किशोर पाटील, जयंत पाटील, बाळाराम पाटील, किशोर दराडे, रत्नाकर गुट्टे, महादेव जानकर, सदाशिव खोत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.