आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअक्कलकोट तालुक्यातील कर्नाटक सीमावर्ती भागातील तडवळ भागातील नागरिकांनी मूलभूत गरजा पुरवण्यात महाराष्ट्र शासन लक्ष देत नसल्याचा आरोप करत कर्नाटकमध्ये जाण्याचा इशारा दिला होता. त्याबाबत ५ डिसेंबरला दुपारी चारच्या सुमाराला आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी अक्कलकोटमध्ये संबंधित लोकांना बोलावून, कर्नाटकात जाण्याचे निवेदन देऊ नयेत. सीमावर्ती भागात मूलभूत गरजा पुरविण्यास शासन सक्षम आहे, असे आश्वासित केले. मात्र त्याच दिवशी सायंकाळी तडवळ परिसरातील ११ गावच्या लोकांनी मूलभूत गरजा पुरवा अन्यथा आम्हाला कर्नाटकास सुपूर्द करा, असा ठराव जिल्हाधिकारी कार्यालयास सादर केला.
अक्कलकोट तालुक्यातील कर्नाटक सीमावर्ती भाग अनेक वर्षापासून मूलभूत सुविधापासून वंचित आहे. याकडे महाराष्ट्र शासनाचे नेहमीच दुर्लक्ष आहे. रस्ते, पाणी, पथदिवे आदी प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत. यासाठी तडवळ भागातील आळगे, शावाळ, धारसंग, कलकर्जाळ, कोर्सेगाव, केगाव बुद्रूक, देवीकवठे, पान मंगरूळ, शावाळ, हिळ्ळी, आंबेवाडी (खुर्द) या ११ गावांना मूलभूत सुविधा द्या अन्यथा कर्नाटकामध्ये आम्हाला समर्पित करा, अशा मागणीचे ठराव सोमशेखर जमशेट्टी (अध्यक्ष - कन्नड साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य), शेगावचे मल्लूगौड अण्णाराव पाटील, आळगेचे महांतेश लक्ष्मण हत्तुरे, मल्लू करपे आदींनी उपजिल्हाधिकारी विठ्ठल विदमाले यांना सादर केले आहेत.
कल्याणशेट्टी यांच्या बैठकीस मुंडेवाडीचे सरपंच बापूराव पाटील, अक्षय गंधगे, बसवराज बाके, विवेक ईश्वरकट्टी, महादेव चराटे, रुक्मुद्दीन कुमटे, रियाज मुल्ला, सरपंच चंद्रकांत यादवाड, माजी जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ कोडते आदी उपस्थित होते.
रस्तेकामांना मंजुरी मिळाली
तडवळ भागातील रस्त्याच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. उसाची रहदारी जास्त असल्याने थोड्या दिवसात कामे चालू होतील. सोमवारी या भागातील प्रमुखांची बैठक घेऊन महाराष्ट्र शासन येथील कामे करण्यास कटिबद्ध असल्याचे सांगितले आहे. त्यावेळी या भागातील सर्वांची इच्छा कर्नाटकामध्ये जाण्याची नाही, असे स्पष्ट केले आहे. -सचिन कल्याणशेट्टी, आमदार
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.