आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासन २००९ मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या महसूल भवनाच्या लोकार्पणाला १४ वर्षानंतर मुहूर्त मिळाला. मंगळवारी १६ मे रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते महसूल भवन इमारतीचा लोकार्पण सोहळा होणार आहे.
या इमारतीमध्ये जिल्हाधिकारीसह १६ कार्यालये असणार आहेत. उर्वरित कार्यालये जुन्या इमारतीमध्येच राहतील. जिल्ह्याच्या विकासाचे निर्णय घेणाऱ्या महसूल भवन इमारतीच्या पूर्णत्वासाठी १४ वर्षे शासनाकडे वाट पहावी लागली. १४ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर जिल्हाधिकारी कार्यालयाची नवीन इमारत वापरासाठी खुली होणार आहे.
मंगळवारी लोकार्पण झाल्यानंतर कामकाज नवीन इमारतीतूनच होणार आहे. उद्घाटन झाल्यानंतर गौण खनिज, नगर परिषद, पुनर्वसन विभाग तत्काळ सुरू होतील. जिल्हाधिकारीसह अन्य कार्यालये सुरू होतील पण तेथे दप्तर पूर्ववत होण्यास २० मे पर्यंतचा कालावधी लागणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते महसूल भवनचे लोकार्पण झाल्यानंतर हेरिटेज गार्डन येथील कार्यक्रमातच नूतनीकरण झालेल्या इंद्रभुवनचेही लोकार्पण होणार आहे. स्मार्ट सिटीतून ४ कोटी ७० लाख रुपये खर्चून इमारतीचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. सोलापूरचे शिल्पकार पुण्यश्लोक अप्पासाहेब वारद यांनी उभारलेली ही वास्तू जनतेला पाहण्यासाठी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत खुली असणार आहे.
जिल्हाधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांचे स्वीय सहाय्यक, अप्पर जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे स्वीय सहाय्यक, निवास उपजिल्हाधिकारी, नागरिकांसाठी कक्ष, व्हीआयपी कक्ष, राजशिष्टाचार, नैसर्गिक आपत्ती, महसूल, गृह, आस्थापना, लेखा विभाग, अंतर्गत लेखा विभाग, सामान्य प्रशासन, कुळ कायदा, गौण खनिज, ग्रामपंचायत, पुनर्वसन, नगर विकास शाखा नवीन इमारतीमध्ये स्थलांतर होतील तर जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयात रोजगार हमी, निवडणुक, जिल्हा व शहर पुरवठा, भूसंपादन क्रमांक १,३,७,११ ही कार्यालये असणार आहेत.
पालकमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व जिल्हाधिकारी डॉ. जगदीश पाटील यांच्या कालावधीत २००९ मध्ये भूमिपूजन झाले. त्यानंतर विजय देशमुख, दिलीप वळसे-पाटील, जितेंद्र आव्हाड, दत्तात्रय भरणे हे पालकमंत्री झाले तर जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांच्यानंतर गोकुळ मवारे, डॉ. प्रवीण गेडाम, तुकाराम मुंढे, रणजितकुमार, डाॅ. राजेंद्र भोसले हे जिल्हाधिकारी होऊन गेले तरी इमारत पूर्णत्वास आली नाही. अखेर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या कालावधीत इमारत पूर्ण झाली आणि त्याचे आता लोकार्पण होत आहे.
५ पालकमंत्री आणि ६ जिल्हाधिकारी बदलले...
महसूल भवन परिसरात जागेची कमतरता आहे. तेथे अनेक झाडे असल्याने एक हजार नागरिक बसतील अशी व्यवस्था करणे अडचणीचे आहे. त्यामुळे महसूल भवन येथे औपचारिक उद्घाटन करून कार्यक्रम इतरत्र करण्याची तयारी सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार असल्याने त्यांचे चाहते आणि भाजपचे कार्यकर्ते गर्दी करतील.
परिणामी त्या परिसरात सुमारे दोन तासापर्यंत वाहतूक बंद ठेवावी लागणार आहे. यातून मार्ग काढत इतरत्र कार्यक्रम करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.