आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:प्रलंबित मागण्यांसाठी महसूलकर्मचाऱ्यांचे मुंडन आंदोलन, संपामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाचे कामकाज ठप्प

सोलापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महसूलमधील रिक्त पदे भरा, नायब तहसीलदार यांना पदोन्नती द्या आदी प्रमुख मागण्यांसाठी महसूल कर्मचारी संघटनेने बेमुदत संप पुकारला आहे. सोमवारपासून महसूलमधील सर्वच कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. बुधवारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाचा निषेध म्हणून मुंडन केले. वारंवार पाठपुरावा करूनही शासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने संघटनेला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला. शासनाकडून मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याची माहिती संघटनेचे उपाध्यक्ष शंतनू गायकवाड यांनी दिली.

महसूल सहायक, वाहनचालक, चतुर्थश्रेणी संवर्गातील रिक्त पदे भरावीत. अव्वल कारकून, मंडलाधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात पदोन्नती द्यावी. सरळ सेवेचे प्रमाण ३३ टक्क्यांवरून २० टक्के करण्यात यावे. नायब तहसीलदार पदाला राजपत्रित दर्जा देऊन ग्रेडमधील त्रुटी दूर कराव्यात. महसूल विभागातील पदोन्नतीची प्रक्रिया विहित कालावधीत पूर्ण करावी. दांगड समितीच्या शिफारशीनुसार सुधारित आकृतिबंद तत्काळ लागू करावा. महसूल विभागातील सर्व अस्थायी पदे कायम करण्यात यावीत. पात्र चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना वर्ग तीनमध्ये पदोन्नती द्यावी, गृह विभागाच्या धर्तीवर महसूल विभागात कॅशलेसची वैद्यकीय सुविधा उपलब्ध करावी, कोतवाल कर्मचाऱ्यांना चतुर्थ श्रेणीमध्ये मुदतीत पदोन्नती द्यावी, या मागण्यांचा समावेश आहे. या आंदोलनामध्ये नायब तहसीलदार प्रवीण घम, राज्य उपाध्यक्ष शंतनू गायकवाड, जिल्हाध्यक्ष जयंत जुगदार, शहराध्यक्ष संदीप लटके, अमर भिंगे, अविनाश गायकवाड, रत्नाकर कांबळे, रविराज नष्टे, शिवाजी भोसले, आनंद गायकवाड, लक्ष्मीकांत आयगोळे, नितीन घनाते यांच्यासह महसूलचे कर्मचारी सहभागी झाले होते.

अधिकारी कार्यालयात, कर्मचारी बाहेर
लिपिक, अव्वल कारकून यांचे आंदोलन सुरू असल्याने सर्व कार्यालयांत शुकशुकाट आहे. सेतू कार्यालयात सही करण्यासाठीही कर्मचारी उपलब्ध नाहीत. कार्यालयात विभागप्रमुख आहेत, पण लिपीक, अव्वल कारकून नसल्याने कामकाज ठप्प झाले आहे. एकही कर्मचारी कार्यालयात हजर झाला नाही. यामुळे महसूलचे कामकाज ठप्प झाले आहे. अनेक कार्यालये कुलूपबंद असून, कार्यालयाबाहेरच फलक लावण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...