आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउजनी धरणातून जिल्ह्यातील शेतीसाठी कालव्यातून यंदा दोनऐवजी तीन आवर्तने देण्याचा निर्णय पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. सलग तीन महिने शेतकऱ्यांना पाणी देण्याचा निर्णय पहिल्यांदाच घेण्यात आला. यापूर्वी फक्त दोन आवर्तनाद्वारे पाणी देण्यात येत होती. १ मार्च ते २० मेपर्यंत २२ टीएमसी पाणी कालव्याद्वारे शेतीसाठी देण्यात येणार आहे. १ ते २७ मार्च पहिले आवर्तन ६.८ टीएमसी, २८ मार्च ते २५ एप्रिल ७.३२ टीएमसीचे दुसरे आवर्तन तर २६ एप्रिल ते २० मे या काळात ६.८० टीएमसीचे तिसरे आवर्तन या पद्धतीने नियोजन करण्याचे आदेश पालकमंत्री विखे-पाटील यांनी दिले आहेत.
पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उजनी प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी आमदार सुभाष देशमुख, संजयमामा शिंदे, सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, महानगरपालिका आयुक्त शीतल तेली उगले, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता धीरज साळे व लाभक्षेत्र विकास प्राधिकरणचे सर्व कार्यकारी अभियंता उपस्थित होते.
उन्हाळी आवर्तनाच्या पहिल्या १० दिवसांत रोज २० तास वीजपुरवठा बंद ठेवण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, महावितरण, महानगरपालिका व अन्य संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेऊन कार्यवाही करावी. कर्नाटक राज्यात वीजपुरवठ्यामुळे अवैध पाणीउपसा होण्याची शक्यता लक्षात घेऊन, तेथील जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून तेथेही वीजपुरवठा बंद ठेवण्याचे आदेश पालकमंत्री यांनी दिले. लाभक्षेत्र विकास प्राधिकरणने अन्य शासकीय यंत्रणांची पूर्ण मदत घ्यावी. आवश्यक तेथे पोलिस संरक्षण घेऊन कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी सादरीकरण केले. उन्हाळी हंगामात यापूर्वी २ आवर्तने दिली जात होती. आता पालकमंत्री यांच्या सूचनेनुसार पाण्याचा काटकसरीने वापर करून उन्हाळी हंगामात ३ आवर्तनांचे नियोजन करण्यात येत असल्याचे सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.