आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिणाम:वाढत्या तापमानामुळे मजूर कामावर येईनात; 7 हजार घरकुलांची कामं अर्ध्यावर

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून तापमानात वाढ होत आहे. मे महिन्यातही तापमानाचा आलेख वाढत आहे. रणरणत्या उन्हात काम करणे मुश्किल झाल्याने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत मजुरांनी कामाला दांडी मारली आहे. मजूरच कामावर येत नसल्याने जिल्ह्यातील ७ हजार घरकुलं, १ हजार २०५ विहिरींचे काम अर्ध्यावर राहिले आहे. स्वत:सह, कुटुंबीयांच्या आरोग्याची काळजी घ्या, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून ग्रामीण भागात विविध प्रकाराचे वैयक्तिक व सार्वजनिक स्वरूपात कामे घेण्यात येतात. या ठिकाणी कामावर येणाऱ्या मजुरांना रोज सुमारे २५८ रुपयांची मजुरी देण्यात येते. एकीकडे मजुरीही कमी व कडक उन्हात काम करणेही मुश्किल असल्याने या कामाकडे मजुरांनी पाठ फिरवली आहे. यंदाच्या उन्हाळ्यात सर्वांधिक ४४.३ अंश सेल्सिअस तापमान सोमवारी (दि. ९) होते. गेल्या पंधरा दिवसांपासून तापमानात सातत्याने चढ-उतार सुरू आहे. वाढत्या उष्णतेमुळे शेत-शिवारात दुपारच्यावेळी मजुरांना काम करणेही अशक्य झाले आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून विहीर, जनावरांचा गोठा, घरकुल बांधणी यासाठी वैयक्तिक लाभार्थींची मागणी आहे. मात्र या योजनेत मजुरी कमी मिळत असल्याने व उन्हात काम करणे अवघड झाल्याने या योजनेकडे मजुरांनी पाठ फिरवली आहे. शेतकऱ्यांच्या शेतात काम करणाऱ्या मजुरास किमान तीनशे ते पाचशे रुपयांची मजुरी देण्यात येते. रोजगार हमी योजनेत आठ तास काम केल्यानंतरही अडीचशे रुपये मजुरी मिळत नसल्याने या कामांसाठी मजुरांची उदासीनता असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मजुरी वाढविणे अत्यंत आवश्यक बाब ठरली आहे.

ग्रामपंचायत विभागाची २९२ कामे सुरू
सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या उन्हाळ्यात जिल्हाभरात सध्या ३९३ विविध कामे सुरू आहेत. या कामावर एकूण दोन हजार ८०० मजूर काम करीत आहेत. ग्रामपंचायत विभागाने सर्वाधिक २९२ कामे सुरू केली असून यात दोन हजार ७१ मजूर काम करीत आहेत. तर अन्य विभागाकडून १०१ कामे सुरू असून यात ७२९ मजूर काम करीत आहेत. उन्हाची तीव्रता वाढतीय. सर्वप्रथम आरोग्याची काळजी घेऊन काम करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत.
ईशाधिन शेळकंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

बातम्या आणखी आहेत...