आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
वसंत पंचमीचा मुहूर्त म्हणजे पंढरीच्या विठुराया आणि रुक्मिणी यांचा शाही विवाह सोहळ्याचा दिवस. मंगळवारी हा सोहळा साजरा झाला. यानिमित्त मंदिर आणि परिसरात ३६ प्रकारच्या तब्बल पाच टन फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.
सकाळी विठ्ठल आणि रुक्मिणीला भरजरी शुभ्र वस्त्रे परिधान करण्यात आली. रुक्मिणीला मोत्याचे दागिने, नथ, हिरवा चुडा आणि विविध दुर्मिळ सुवर्णालंकारांनी सजवण्यात आले. अकराच्या रुमारास रुक्मिणीच्या गर्भगृहातून मानाचा गुलाल श्री विठ्ठलाकडे नेण्यात आला. तिथे गुलालाची उधळण करण्यात आली. नंतर विठ्ठलाचा गुलाल नेऊन रुक्मिणीच्या गर्भगृहातही गुलालाची उधळण झाली. सनईच्या मंगल स्वरात श्री विठ्ठल आणि रुक्मिणीच्या विविध अलंकारांनी सजवलेल्या उत्सवमूर्ती विवाह सोहळ्याच्या ठिकाणी आणण्यात आल्या. फुलांनी सजवलेल्या मांडवासमोर अब्दागिऱ्या, चांदीचे दंड घेऊन खास पट्टेवाल्यांना उभे करण्यात आले होते.
मोत्यांच्या मंुडावळ्या : दोन्ही मूर्तींना फुलांसह मोत्यांच्या मुंडावळ्या बांधण्यात आल्या. ब्रह्मवृंदाच्या मंत्रघोषात अंतरपाट धरण्यात आला. उपस्थित मोजक्या वऱ्हाडींना फुलांच्या पाकळ्या आणि अक्षतांचे वाटप झाले. पुरोहित समीराचार्य कौलगी आणि विठुरायाच्या पूजेचे पौरोहित्य करणारे संदीप कुलकर्णी यांनी मंगलाष्टके म्हटली आणि मंगलाष्टक होताच टाळ-मृदंगाच्या गजराने अवघा परिसर दुमदुमून गेला.
विवाह सोहळ्याची आख्यायिका अशी...
संत एकनाथ महाराजांनी लिहिलेल्या ‘रुक्मिणी स्वयंवरा’त वसंत पंचमीला श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा विवाह झाला, असा उल्लेख आहे. याआधी उत्पात मंडळींकडून हा विवाह सोहळा पार पाडला जात असे. त्यानंतर आता मंदिर समिती विठ्ठल मंदिरात आणि उत्पात समाज त्यांच्या वसिष्ठ आश्रमात हा सोहळा साजरा करून परंपरा जतन करत आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.