आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

नवा उपक्रम:ग्रामीण महिलांची उत्पादने थेट अॅमेझाॅन, फ्लिपकार्टवर; आंतरराष्ट्रीय मार्केट उपलब्ध

सम्मेद शहा | सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ग्रामविकास खात्याच्या पुढाकारातून नवा उपक्रम

आता ग्रामीण भागातील महिलांच्या उत्पादनांना वर्षभर अॅमेझाॅन, फ्लिपकार्टसारख्या ऑनलाइन स्वरुपाची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. यासाठी ग्रामविकास खात्याने पुढाकार घेतला आहे. वर्धा जिल्ह्यातील ३३ उत्पादनांच्या ई-मार्केटिंग प्लॅटफॉर्मवरील नोंदणी या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता गावपातळीवरील उत्पादने ही आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये जाणार आहेत. या नव्या उपक्रमातून ग्रामीण महिलांच्या कार्याला चालना मिळणार आहे.

राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागांतर्गत उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची अंमलबजावणी केली जात आहे. ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील महिलांचे सक्षमीकरण करून त्यांचे जीवनमान उंचावणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. यानुसार आजपर्यंत राज्यात ४.६२ लक्ष स्वयंसहाय्यता समूह स्थापन करण्यात केले आहेत. यात ४६.७० लक्ष ग्रामीण कुटुंबाचा समावेश आहे. आतापर्यंत १९ हजार ६०६ ग्रामसंघ, ७९५ प्रभाग संघ, ८ हजार ४०५ उत्पादक गट तर १५ उत्पादक कंपन्या स्थापन केल्या आहेत. स्वयंसहाय्यता समूहांनी एकूण ३३६ प्रकारची उत्पादने विकसित केली आहेत. बाजारपेठ मिळवून देण्यासाठी उमेद अभियानातून विविध स्तरावर सरस प्रदर्शननांचे आयोजन केले जाते. मात्र, त्या उत्पादनांना वर्षभर मागणी असते. त्यामुळे त्यांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी ग्रामविकास विभागाने अॅमेझाॅन, फ्लिपकार्ट सारख्या ई मार्केटिंग प्लॅटफॉर्मवर ग्रामीण महिलांच्या उत्पादनांची नोंदणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये गावपातळीवरील उत्पादने

उमेदच्या महिला उत्पादनांना सरसच्या माध्यमातून मर्यादित बाजारपेठ उपलब्ध होत होती. आता वर्षभर ऑनलाइन बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. ग्रामीण महिलांनी बनविलेले उत्पादन जगभरात विकले जातील. ई -प्लॅटफाॅर्मवर नोंदणी करण्याच्या स्वयंसहाय्यता समूहांना सूचना दिल्या आहेत. आम्ही आता त्यांच्या उत्पादनास अन्न परवाना, व्यवसायाचा उद्योग आधार, उत्पादनातील साहित्यांचा दर्जा, पॅकिंग याची माहिती घेत आहोत. राजरत्न जावळे, व्यवस्थापक, उमेद, मोहोळ

३१ जुलैपर्यंत ई-मार्केटिंग प्लॅटफाॅर्मवर नोंदणी

खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या एक जुलै रोजीच्या सूचनेनुसार राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ३१ जुलैपर्यंत जिल्ह्यातील उमेदच्या स्वयंसहाय्यता महिला समूहातील उत्कृष्ट उत्पादनांची ई मार्केटिंग प्लॅटफाॅर्मवर नोंदणी करून अहवाल द्यावयाचा आहेत. अभियानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांनीही तसे पत्रक काढले आहे. यामुळे भविष्यात ग्रामीण भागातील महिलांनी बनविलेल्या उत्पादनास वर्षभर बाजारपेठ उपलब्ध होईल. शिवाय त्या उत्पादनांचा लोकल टू ग्लोबल असा प्रवास होणार आहे.

0