आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Solapur
  • Sadguru Set Out On The Next Journey With The Message To Stop Soil Damage; Departed To Hyderabad By Bike For Propagation In Telangana |marathi News

सोलापुरात उत्साहात स्वागत:मातीचे नुकसान थांबवण्याचा संदेश देऊन सद्गुरू निघाले पुढच्या प्रवासाला; तेलंगण येथील प्रसारासाठी हैदराबादला दुचाकीने रवाना

सोलापूर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माती वाचवा मोहिमेवरील हाय प्रोफाइल आध्यात्मिक गुरू जग्गी वासुदेव मंगळवारी रात्री उशिरा दुचाकीवरून सोलापुरात आले. बुधवारी सकाळी निमंत्रितांशी मातीचे नुकसान थांबवण्यासंबंधी संवाद साधला. त्यानंतर दुचाकीवरून शहरातील प्रमुख रस्त्यावरून निघाले. यावेळी ठिकठिकाणी सोलापूरकरांनी त्यांना अभिवादन करत पाठिंबा दर्शवला.

आतापर्यंत सद्गुरू यांनी २७ देशांतून सुमारे २५ हजार किलोमीटरची यात्रा पूर्ण केली आहे. सध्या भारतातील पाच राज्यांतील प्रवासानंतर ते महाराष्ट्रात दाखल झाले. मंगळवारी पुण्याचा कार्यक्रम उरकून रात्री १२.१० वाजता सोलापुरात आले होते.

चाहत्यांनी मंगळवारी सायंकाळी सहा वाजल्यापासूनच जुना पुना नाका येथे गर्दी केली होती. तब्बल सहा तास उशिरा आले तरी गर्दी कमी झाली नव्हती. उलट गर्दी वाढतच गेली. तेथे त्यांचे जंगी स्वागत केले. बुधवारी सकाळी हॉटेलमध्ये निवडक लोकांशी संवाद साधला. काहीजण जबलपूर तर काहीजण राजस्थानवरून आले होते.

हॉटेलमधील रूममधून बाहेर येताच अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, पोलिस उपायुक्त वैशाली कडुकर, उपायुक्त दीपाली घाटे, पोलिस निरीक्षक कुर्री यांच्यासह सातजण उपस्थित होते. सद्गुरुंनी त्यांना गुलाबाचे पुष्प देऊन आशीर्वाद दिले. यानंतर लहान मुलांना वेळ दिला. समाजाला माती वाचवण्याचा संदेश दिला. यानंतर ते बाइकवरून होटगी रोड, सात रस्ता, सरस्वती चाैक, जुना पुना नाका, मार्केट यार्डमार्गे हैदराबादला रवाना झाले. जुना पुना नाका ढोल पथकाने त्यांचा जयजयकार केला.

जातील तेथे सद्गुरू देताहेत हा संदेश सध्या, निसर्गाचे संवर्धन करण्याचा सर्वांत महत्त्वाचा पैलू म्हणजे माती. जर आपण मातीचे नुकसान थांबवू शकलो नाही, तर हा ग्रह मनुष्यांसाठी जगण्यास पोषक राहणार नाही. मातीच्या पुनरुज्जीवनासाठी सरकारी धोरणे निर्माण होण्यासाठी जगभर १०० दिवसांत दुचाकीवरून ३० हजार कि.मी.चा प्रवास करून जागृती करण्याचा सद्गुरूंचा संकल्प आहे. प्रत्येक सेकंदाला १ एकर मातीचे वाळवंटात रूपांतर होत आहे. मातीला पिकांचे पोषण करण्यासाठी सेंद्रिय घटकांची गरज आहे. सेंद्रिय घटक पालापाचोळ्यातून आणि प्राण्यांच्या विष्ठेतून प्राप्त होतात.

बातम्या आणखी आहेत...