आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दसरा विशेष!:संभाजी आरमारचा 15 वा दसरा दरबार उत्साहात; महाराजांच्या मूर्तीचे शस्त्रपूजन करून केला शुभारंभ

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संभाजी आरमारचा 15 वा दसरा दरबार मोठ्या उत्साही वातावरणात तुडुंब उच्चभरलेल्या सभागृहात जल्लोषात साजरा झाला. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीचे आणि शस्त्रपूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

याप्रसंगी महापालिकेच्या सहा. आयुक्त पुष्पगंधा भगत, महावितरणचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत दिघे, मुख्य लेख व वित्त अधिकारी उत्तम सुर्वे, हृदयरोगतज्ञ् डॉ. सुनील शेवाळे, ऍड. गणेश पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बहारदार दसरा दरबार संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे हे होते. प्रसंगी सोलापूरच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये प्राणार्पण केलेले हुतात्मा मलप्पा धनशेट्टी यांचे पणतू शिवकुमार धनशेट्टी यांचा मानपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला.

तसेच व्यंगचित्रकार उन्मेष शहाणे, सामाजिक कार्यकर्ते किरण लोंढे, शतकवीर पेशीदाता शैलेश जाधव, जयहिंद फूड बँकेचे सतीश तमशेट्टी, बेघर व्यक्तीसाठी उल्लेखनीय कार्य करणारे मोहन तलकोलोल्लू यांचा त्यांच्या योगदानाबद्दल सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असल्याने "स्वातंत्र्य लढयातील सोलापूरचे योगदान" या विषयावर डॉ. श्रीकांत येळेगावकर यांचे व्याख्यान देखील आयोजित करण्यात आले होते.

डॉ. येळेगावकर यांनी भारतीय स्वातंत्र्य लढयातील सोलापूरचे अतुलनीय योगदान सांगत असताना ब्रिटिशांच्या ताब्यात जाणारे शेवटचे शहर सोलापूर असल्याचे सांगत पारतंत्र्यात स्वातंत्र्य उपभोगणारे देखील सोलापूर हे एकमेव शहर असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. तसेच संपूर्ण भारतात ब्रिटिशाना मार्शल लॉ लावण्याची वेळ आणणारे देखील सोलापूर हे एकमेव शहर असल्याचे सांगितले. सोलापूरच्या गिरणी कामगारांनी या लढ्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवत ब्रिटिशांना सळो की पळो करून भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात बजावलेली कामगिरी प्रत्येक सोलापूरकराने अभिमानाने मिरवली पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी केले.

मलप्पा धनशेट्टी, श्रीकिसन सारडा, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन या क्रांतिकाराना १२ जानेवारी १९३२ रोजी येरवडा येथे फाशी झाल्यामुळे त्या एक वर्षीच सोलापूरची गड्डा यात्रा भरली नसल्याचा इतिहास देखील सांगितला. याप्रसंगी संभाजी आरमार उपाध्यक्षपदी शशिकांत शिंदे, शहरप्रमुख सागर ढगे, शहर संघटक राज दवेवाले, उपशहरप्रमुख राज जगताप, रोहित मनसावाले यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमचे सूत्रसंचालन गिरीश देवकते यांनी तर प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन तुकाराम जाधव यांनी केले. याप्रसंगी संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे, प्रदेश संघटक प्रकाश डांगे, जिल्हाप्रमुख गजानन जमदाडे, जिल्हा संघटक अनंतराव नीळ, उपजिल्हाप्रमुख राजेश पाटील, संपर्कप्रमुख सागर संगवे यांच्या सह आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...