आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घोषणा:पंढरपुरात साने गुरुजी स्मृती केंद्र आणि संत विचार पीठ होणार; राष्ट्र सेवा दलाची घोषणा

सोलापूर, पंढरपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘शिरोमणी नामदेव महाराज, जगद्गुरू तुकाराम महाराज, चोखामेळा, जनाबाई या संतांनी समताधिष्ठित समाज व्यवस्थेची निर्मिती व्हावी असे १३-१४ व्या शतकात प्रयत्नपूर्वक सांगितले. पण २० व्या शतकात पंढरपुरात येऊन साने गुरुजींना अस्पृश्यांना श्री विठ्ठल मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी आमरण उपोषण करावे लागले हा इतिहास आहे. म्हणून अशा समतेचा जागर वारंवार झाला पाहिजे. त्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्याचाच एक भाग म्हणून पंढरपूरमध्ये साने गुरुजी स्मृती केंद्र आणि संत विचार पीठ लवकरच स्थापन केले जाईल, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य राष्ट्र सेवादलाचे कार्याध्यक्ष राजाभाऊ अवसक यांनी केले.

श्री विठ्ठल मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा यासाठी साने गुरुजींनी येथील संत तनपुरे महाराज मठात १० दिवस आमरण उपोषण केले होते. त्या ऐतिहासिक उपोषण आंदोलनास १० मे रोजी ७५ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त येथील संत कैकाडी महाराज मठात साने गुरुजी स्मृती केंद्र व संत विचारपीठाच्या वतीने विचार मंथन सभा आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून साथी पन्नालाल सुराणा उपस्थित होते. अध्यक्षस्थानी भारत जाधव महाराज होते.

सर्व विचारवंतांनी नामदेव पायरीजवळ संत श्रेष्ठ नामदेव महाराज पादुका व चोखामेळा यांच्या समाधीवर पुष्पहार अर्पण करून विठ्ठलाचे दर्शन घेतले. तिथेच संत श्रेष्ठ नामदेव महाराज व जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे अभंग गायले. नंतर सर्वजणांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संत कैकाडी महाराज मठामध्ये एकत्रित आले. साथी पन्नालाल सुराणा म्हणाले, ‘संविधानामध्ये अभिप्रेत असणारे व समताधिष्ठित समाजव्यवस्था असलेले राष्ट्र निर्माण करण्यासाठी प्रत्येकांनी आपापल्या माध्यमातून सातत्याने कार्य करणे गरजेचे आहे. साने गुरुजींच्या उपोषणाला यश मिळाले. कारण त्यांनी जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न घेऊन संघटित कार्य केले. गांधीजींनी १९३२ साली केलेल्या उपोषणाचा मुद्दाही हाच होता. एकत्र राहून संघर्ष केल्यास त्याचा परिणाम तत्काळ मिळतो त्यामुळे सर्वांनी प्रथम संघटित होऊन लढा दिला पाहिजे.

यावेळी धनंजय होनमाने, ज्ञानेश्वर महाराज बंडगर, डॉ. श्रीरंग गायकवाड, डॉ. श्यामसुंदर मिरजकर आदीनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक दादासाहेब रोंगे यांनी केले. यावेळी समाजसेवक चंद्रकांत देशमुख, शिवाजी शिंदे, दत्ता कोंडलकर, मोहनानंद महाराज, संतोष महाराज, बाळासाहेब कुंभार, साथी उपेंद्र टण्णू, माधव कारंडे, नागेश अवताडे, प्रा. गुरुराज महाराज इनामदार, संदीप वाकचौरे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन शिवाजी शिंदे व सुभाष करे यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...