आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शहीद जवानावर अंत्यसंस्कार:पानगांव येथे शहीद सुनिल काळे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, भाऊ आणि मुलाने दिला मुखाग्नी

सोलापूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गावकऱ्यांनी जड अंत:करणाने आपल्या लाडक्या वीर भूमिपुत्राला दिला अखेरचा निरोप

काश्मीर मधील पुलवामा जिल्ह्यातील बांदझू येथे मंगळवारी पहाटे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन दहशवाद्यांचा खात्मा करून शहीद झालेले पानगांव (ता. बार्शी जि. सोलापूर) येथील सुपुत्र, वीरजवान सुनिल दत्तात्रय काळे (वय ४२) यांच्यावर शासकीय इतमामात सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या पंचक्रोशीतील नागरिकांनी अमर रहे..अमर रहे..सुनिल काळे अमर रहे..अशा जयघोषात आपल्या लाडक्या भूमिपूत्राला साश्रूनयनांनी जड अंत:करणाने अखेरचा निरोप दिला. 

दक्षिण काश्मीर मधील पुलवामा जिल्ह्यातील बांदझू येथे दहशतवाद्यांशी लढताना सुनिल काळे यांना वीरमरण आले होते. ते शहीद झाल्याची वार्ता पानगांवमध्ये समजल्यानंतर अख्खे गाव कडकडीत बंद झाले. जिल्हाभरातून शोक व्यक्त होता. मंगळवारी रात्री काळे यांचे पार्थिव पुण्याहून बार्शीला व तेथून सकाळी पानगांव येथे आणण्यात आल्यानंतर गावकऱ्यांना हुंदका अनावर झाला. काळे यांच्या गावातील घराजवळ पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यानंतर फुलांनी सजवलेल्या ट्रॉलीत तिरंग्यात लपटलेले पार्थिव गावातील प्रमुख रस्त्यावरून स्मशानभूमीकडे नेण्यात आले. रस्त्यावर श्रध्दांजलीपर रांगोळी काढण्यात आली होती. पार्थिव जात असताना नागरिक घरासमोरून अंत्यदर्शन घेत होते. पार्थिव स्मशानभूमी येथे नेण्यात आले. 

यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी राज्य शासनाच्यावतीने तर जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी जिल्हा प्रशासनाच्यावतीने शहीद जवान सुनिल काळे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. सीआरपीएफच्यावतीने आयजी संजय लाटकर, डीआयजी बी के टोपो, डी एस मिश्रा यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी खासदार ओम राजेनिंबाळकर, आमदार राजेंद्र राऊत, जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, पोलीस अधिक्षक मनोज पाटील, तहसीलदार प्रदीप शेलार, डीवायएसपी डॉ.सिध्देश्वर भोरे, गटविकास अधिकारी शेखर सावंत, बार्शीचे नगराध्यक्ष असिफ तांबोळी, पालिका विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे, भाऊसाहेब आंधळकर, वैरागचे पोलीस निरीक्षक अरूण सुगावकर, तालुका पोलीस स्टेशनचे सपोनि राहूल देशपांडे, शहरचे सपोनि शिवाजी जायपत्रे,  पानगांवच्या सरपंच सखुबाई गुजले, डॉ.बी.वाय.यादव, जयकुमार शितोळे, डॉ. संजय अंधारे, डॉ. जितेंद्र तळेकर व माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी आदींनी काळे यांच्या पार्थिवास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी केंद्रीय राखीव पोलीस दल व सोलापूर ग्रामीण पोलीसांच्यावतीने हवेत फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर काळे यांचे थोरले बंधू नंदकुमार, काळे यांचा मुलगा श्री, आयुष यांनी चितेस अग्नी दिला. यावेळी काळे यांच्या आई कुसुम, पत्नी अर्चना, भाऊ नंदकुमार यांना शोक अनावर झाला होता. यावेळी लोकप्रतिनिधी तसेच अधिकारी यांनी काळे कुटूंबियांचे सांत्वन केले. 

ज्यांचे रक्त देशासाठी कामी येते ते खरेच भाग्यवान असतात : मिश्रा 

यावेळी सीआरपीएफचे कमांडंट डी एस मिश्रा म्हणाले, यापूर्वी सुनिल काळे यांनी ३ जूनला तीन अतिरेक्यांना मारण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यामुळे त्यांचे नांव वीरता पोलीस पदकासाठी पाठविण्यात आले होते. २३ तारखेला एका घरात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाली. त्या घराची सीआरपीएफ जवानांनी घेराबंदी केली. दहशतवादयांचा खात्मा करण्यासाठी जवान घरात घुसत असतानाच दहशतवादी अचानक बाहेर आले व आमनेसामनेच्या लढाईत जवानांच्या गोळीबारात दोन दहशतवादी मारले गेले. त्यांचीही गोळी जवान सुनिल काळे यांना लागली. त्यात ते शहीद झाले. सुनिल काळे यांच्यासारखे वीर जवान कधीही मरत नाहीत ते अमर होतात. काळे यांच्या बलिदानातून आपण प्रेरणा घेवू व दृढसंकल्प करू की, जोपर्यंत देशाचा शेवटचा दुश्मन समाप्त होत नाही तोपर्यंत निडरपणे मुकाबला करू. देशासाठी शेवटच्या क्षणापर्यंत शौर्य दाखविणारे सुनिल काळे.. देशाला एक बहादूर जवान देणाऱ्या त्यांच्या माता ..व देशाला असा सुपुत्र देणारे परिवारजण हे खरेच धन्य आहेत. या सर्वांबद्दल आपल्याला गर्व वाटतो. ज्यांचे रक्त देशासाठी कामी येते ते खरेच भाग्यवान असतात अशा शब्दात त्यांनी आदरांजली वाहिली. 

पालकमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, काळे हे देशासाठी शहीद झाले. त्यांच्या परिवारजनाला दु:खातून सावरण्याची शक्ती ईश्वर देवो. राज्य शासन काळे कुटूंबियांच्या पाठीशी भक्कमपणे राहील व शासनाच्यावतीने जी मदत काळे कुटूंबिंयाना करता येईल ती केली जाईल अशी ग्वाही दिली.

नुकतीच मिळाली होती हेड काँस्टेबल पदी बढती

दहशतवाद्यांशी आपल्या जीवाची परवा न करणारे सुनील काळे गेल्या 17 वर्षांपासून केंद्रीय राखीव पोलिस दालत काम करत होते. नुकतेच त्यांना हेड काँस्टेबल या पदावर बढती मिळाली होती. दोन भाऊ आणि एका बहीणीत ते मधले बंधू होते. कुटुंबियांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांनी जानेवारी महिन्यातच गावी येऊन कुटुंबियांची भेट घेतली होती. यानंतर ते पुन्हा ड्युटीवर परतले. याच महिन्यात पुन्हा सुटी घेऊन गावी येण्याचे त्यांचे नियोजन होते. परंतु, कोरोना असल्याने ते घरी येऊ शकले नाही.

वर्षभरात निवृत्ती घेऊन घरी येणार होते

सुनील काळे गावात अतिशय मनमिळावू आणि मितभाषी होती. नेहमीच लोकांसाठी धडपड करणारे सुनील काळे यापूर्वी गावी आले तेव्हा त्यांनी पाणी फाउंडेशनसाठी काम देखील केले होते. सुनील काळे यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, येत्या वर्षभरात त्यांची सीआरपीएफमधून निवृत्त होणार होती. यासाठी त्यांनी गावात राहण्याचे नियोजन केले होते. नेहमीच भाऊ, आई आणि पत्नीसोबत या विषयावर चर्चा व्हायची. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या भावाशी फोनवर संवाद साधला होता. त्यावेळी भावाने गावात एक बोअरवेल खोदल्याचा फोटो त्यांना पाठवला होता. यावर सुनील खूप खुश होते असे त्यांच्या बंधूंनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...