आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सन्मान:मंत्रिपदापेक्षा जिल्हा परिषदेमध्ये काम करण्याचे समाधान वेगळेच; जिल्हा परिषदेतर्फे माजी अध्यक्ष, ग्रामसेवक, सुंदरगाव पुरस्कार वितरण

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामीण भागात विकासाच्या योजना चांगल्या पद्धतीने ग्रामसेवकांनी राबवणे आवश्यक आहे. त्यातूनच एक आदर्श गाव व ग्रामपंचायती तयार होतात. गावकऱ्यांची केलेली सेवा ते कधीच विसरत नाहीत. जिल्हा मध्यवर्ती बँकेचा अध्यक्ष झालो, कारखान्याचा चेअरमन होतो, आता आमदार होऊन मंत्रीही झालो. परंतु जे समाधान जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असताना होते ते कुठेच मिळत नाही. कारण जिल्हा परिषदेने ठरवल्यास काहीही होऊ शकते, असे प्रतिपादन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने हुतात्मा स्मृती मंदिर येथे अमृत महोत्सवानिमित्त आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण पालकमंत्री भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. समारंभाला जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी केले.

पुढे बोलताना भरणे म्हणाले, राज्य सरकार ग्रामविकासासाठी अनेक योजना राबवत आहे. शासनातर्फे उपलब्ध करून दिला जाणारा निधी जनकल्याणासाठी आहे. प्रत्येक गावाचा विकास करण्यासाठी ग्रामसेवक प्रयत्न करीत असतो. मात्र नागरिकांनी गावाच्या विकासासाठी झटले पाहिजे. ग्रामविकासाच्या योजना यशस्वी होण्यासाठी लोकसहभागही महत्त्वाचा आहे. कोणतेही काम पारदर्शीपणे केले तर गावाचा कायापालट होऊ शकतो. इतर जिल्ह्याच्या तुलनेत सोलापुरात विविध योजना यशस्वी राबवल्या जातात. मात्र टिमकी वाजवण्यात कमी पडत असल्याचे पालकमंत्री म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...