आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोहळा:शिल्पसृष्टी, विद्युत रोषणाई, दुग्धाभिषेकाने शिवराज्याभिषेकाचा सोहळा उत्साहात

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महिलांनी घातलेले भगवे फेटे, पुरुषांनी घातलेल्या टोप्या आणि आकर्षक लेझर शो च्या झोतात अभिनव पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. तेथील शिल्पसृष्टी आणि विद्युतरोषणाई डोळ्यांचे पारणे फेडत होती. पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळाली.

छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भगवे फेटे घातलेल्या महिला, स्त्री-पुरुषांनी हातात घेतलेले झेंडे, ढोल, ताशा, तुतारीचा निनाद आणि शिवरायांच्या वेशभूषेतील चिमुकले यामुळे सोहळ्याची रौनक वाढली होती. वेगवेगळ्या संघटनांकडून मिरवणुका काढण्यात आल्या. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून हा सोहळा साजरा करता आला नव्हता. त्यामुळे यंदाचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. शिवस्मारक येथे सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास अनेक संघटनांनी येऊन शिवरायांसमोर नतमस्तक होऊन अभिवादन केले.

शिवराम प्रतिष्ठानच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी शिवस्मारक येथील पंचधातू मूर्तीची पूजा करण्यात आली. यानंतर पालखीचे पूजन करण्यात आले. वारकरी महिला व शिवभक्त यांच्यासह पालखी मार्गस्थ झाली. पालखी मिरवणूक शिवस्मारक ते पांजरपोळ चौक या मार्गावरून काढण्यात आली. शिवाजी महाराज चौकातील पुतळ्यास दुग्धाभिषेक करण्यात आला. शिवभक्तांच्या उपस्थितीत शिवगर्जना, अारती करण्यात आली. शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्यास लेझर शो करण्यात आला होता.

पत्रा तालीम ग्रुपच्या वतीने चार हुतात्मा पुतळा येथून मिरवणूक काढण्यात आली होती. चार पुतळा ते पांजरपोळ चौक या मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत शिवरायांची मोठी प्रतिमा होती. तरुणांची लक्षणीय उपस्थिती होती. दोन्ही मिरवणुका आणि शहरातील समस्त शिवप्रेमी यांच्यामुळे पांजरपोळ चौक पूर्णपणे भरून गेला होता.

अभिनव पद्धतीने दुग्धाभिषेक
शिवस्मारक येथून पालखी सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. भगवे फेटे महिलांनी परिधान केले होते. भगव्या टोप्या पुरुषांनी घातल्या होते. ढोल पथक आणि डॉल्बीच्या उत्साहात शिवभक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. अभिनव पध्दतीने दुग्धाभिषेक करण्यात आला. लेझर शोद्वारे दारूकामाची आतषबाजी आकर्षक होती. उपस्थित शिवभक्तांनी मोबाइल बॅटरीचा उजेड करून अभिवादन केले. एकूणच वातावरण भारावणारे होते.

बातम्या आणखी आहेत...