आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुटपुंजी सुरक्षा:एका रेल्वे गाडीसाठी केवळ 2 पोलिसांची सुरक्षा ; सोलापूर विभागात रेल्वे गाड्यांना तुटपुंजी सुरक्षा

सोलापूर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर रेल्वे विभागातून रोज लाखो प्रवाशांची ये-जा होते. परंतु, या रेल्वे प्रवाशांची सुरक्षा ही केवळ १३० लोहमार्ग पोलिसांवर विसंबून आहे. त्यामुळे एका रेल्वे गाडीसाठी केवळ दोनच पोलिस कर्मचारी तैनात असतात. या तुटपुंजा सुरक्षा व्यवस्थेमुळे चोऱ्यामाऱ्या, दरोड्याचे प्रमाण अधिक असल्याचे पाहायला मिळत आहे. २००३ मध्ये ६० ते ७० कर्मचाऱ्यांवर सोलापूर विभाग सुरू करण्यात आला. तत्पूर्वी सोलापूर विभाग पुणे लोहमार्ग पोलिस अंतर्गत होता. तेव्हाच्या कर्मचारी संख्येच्या तुलनेत आज किमान चार पट वाढणे आवश्यक होते. मात्र याबाबत लोहमार्ग पोलिस विचार करताना दिसत नाही. सध्या सोलापुरातून ८० हून अधिक रेल्वे धावतात. या प्रत्येक रेल्वे गाडीत दीड हजारहून अधिक प्रवासी असतात. परंतु, प्रत्येक रेल्वेला सोलापूर विभागातून केवळ दोन किंवा तीन कर्मचारी दिले जातात. त्यामुळे रेल्वे गाडीत एका टोकाला काही गुन्हा घडला तर तेथपर्यंत पोहोचेपर्यंत गुन्हेगार पसार व्हायला वाव मिळतो. या तोकड्या सुरक्षेचा फायदा दरोडेखोरांना आणि चोरट्यांना होतो. प्रवासी महिलांचे दागिने ओढणे, मंगळसूत्र ओढणे किंवा सिग्नलला थांबल्यानंतर गाडी लुटणे असे प्रकार सोलापूर विभागात पुन्हा पुन्हा घडतात. या गंभीर प्रकारांवर अद्यापही नियंत्रण आलेले नाही. बोरोटी दरोडा प्रकरणात चोरीस गेलेले दागिने अन् ऐवज अजूनही मिळालेला नाही.

^नेमके सांगता येणार नाही, पण सध्या १३० कर्मचारी कामावर आहेत. एखादी घटना घडली तर वाढीव कुमक येते, ती पुन्हा परत बोलावली जाते. १३० कर्मचाऱ्यांमध्ये कुर्डुवाडी-मिरज-सोलापूर ठाण्याचे काम चालते. प्रवीण चौगुले, उपअधीक्षक लोहमार्ग

बातम्या आणखी आहेत...