आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:संवेदनशील देवगाव तीस वर्षांनंतर बिनविरोध ; रामेश्वर पाटील गटाला 4 जागा

बार्शी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बार्शी तालुक्याच्या राजकारणात संवेदनशील गाव म्हणून ओळख असलेल्या देवगावची ग्रामपंचायत निवडणूक ३० वर्षानंतर बिनविरोध झाली आहे. आमदार राजेंद्र राऊत यांनी गावातील त्यांच्याच दोन्ही गटांना निवडणूक बिनविरोध करण्याबाबत सांगितल्यानंतर दोन्ही गटांनी सामोपचाराने घेत निवडणूक बिनविरोध केली. पूर्वी या गावातील सोपल गटाचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे रामेश्वर मांजरे यांनी येथील ग्रामपंचायतीवर सलग २५ वर्ष अधिराज्य गाजवले आहे. देवगाव मध्ये ग्रामपंचायत निवडणूक असो की विधानसभा या गावावर राजकीय चुरस व इरस पहायला मिळते. निवडणुकांमधील भांडणतंटे, सातत्याने या ना त्या कारणाने होणारी भांडणे, मारामाऱ्या यामुळे या गावाची वेगळी ओळख बनलेली. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत याच गावात गोळीबाराची घटना घडली होती. तेंव्हापासून हे गाव बार्शीच्या राजकारणात अधिक चर्चेत आले. येथील रामेश्वर मांजरे यांची गावातील राजकारणावर चांगली पकड. तब्बल २५ वर्षाहून अधिक काळ त्यांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावच्या कारभाराची सूत्रे स्वत:कडे ठेवण्यात यश आले. रामेश्वर मांजरे हे पूर्वी सोपल यांचे समर्थक होते. स्थानिक राजकारणात आपल्या गटाला ताकद देण्याच्या दृष्टिकोनातून राऊत यांनीही येथील अविनाश मांजरे यांना उचलून धरत त्यांना पंचायत समितीचे उपसभापती केले. राजकारणातील मैत्री जशी कायमची नसते तद्वतच शत्रूत्वही कायमचे नसते असे म्हटले जाते. रामेश्वर मांजरे यांची राऊत यांच्यासोबत ऊठबस वाढली. आ. राऊत यांनीही दोन्ही गटांना सामोपचाराने घेण्याच्या सूचना दिल्यानंतर निवडणूक बिनविरोध करण्याचे ठरले. आता बिनविरोधची औपचारिक घोषणा बाकी आहे.

निवडणूक बिनविरोध करण्यासाठी रामेश्वर मांजरे, माजी पं. स. उपसभापती अविनाश मांजरे, चांगदेव मांजरे, रामेश्वर पाटील, सज्जन मांजरे, बाबासाहेब मांजरे, गोकुळदास मांजरे, रामदास मांजरे आदी दोन्ही गटातील प्रमुख नेतेमंडळींनी सामंजस्याने सरपंच व सदस्यांची निवड करत ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केली. आ. राऊत यांनी निवडणूक बिनविरोध केल्याबद्दल गावातील प्रमुख नेतेमंडळींचे अभिनंदन केले.

असा ठरला आहे सत्तेचा वाटा दोन्ही गटापैकी रामेश्वर मांजरे गटाला सदस्य पदाच्या ९ पैकी ५ जागा तर अविनाश मांजरे, रामेश्वर पाटील गटाला ४ जागा. प्रारंभी ३ वर्ष सरपंचपद रामेश्वर मांजरे गटाकडे तर उर्वरीत २ वर्ष सरपंचपद अविनाश मांजरे व रामेश्वर पाटील गटाकडे ठेवल्याचे सांगितले जाते.

नवनिर्वाचित सरपंच व सदस्य सरपंच : फिरोज बडेमियाँ मुलाणी, सदस्य : शेेखर वैेजिनाथ मारकड, हणमंत चंद्रकांत पाटील, सुमन अंकुश चव्हाण, संदीप तुकाराम मांजरे, शिला भारत जगताप, शैला दत्तात्रय मांजरे, प्रकाश मारुती मांजरे, रेणुका संतोष मारकड, शैलजा गोकुळदास मांजरे

बातम्या आणखी आहेत...