आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील सांडपाण्यावर दैनंदिन १५ एमएलडी क्षमतेचा प्रक्रिया प्रकल्प आहे. शिवाय ११० कोटी रुपये खर्चून ३ टप्प्यांत भूमिगत गटार योजना राबवली आहे. तरीही दररोज लाखो लिटर्स सांडपाणी आणि मैला मिश्रित ड्रेनेजचे पाणी थेट चंद्रभागा नदीत येत आहे. प्रदूषित पाणी रोखण्यात पंढरपूर नगरपालिका हतबल झाली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने याकडे साफ दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. प्रशासकीय यंत्रणेच्या निष्क्रियतेमुळे नमामिऐवजी क्षमामि चंद्रभागा म्हणायची वेळ पंढरपूरचे नागरिक, लाखो वारकरी आणि पर्यावरणप्रेमींवर आलेली आहे.
शहराचे सांडपाणी नदीत जाऊ नये यासाठी तीन टप्प्यात भूमिगत गटार योजना राबविण्यात आली. पहिला टप्पा १९९२ साली राबवण्यात आला. त्यामध्ये जुने पंढरपूर शहर भूमिगत गटार योजनेद्वारे जोडण्यात आले. त्या भागातील सांडपाणी विष्णूपद येथे नेऊन प्रक्रियेअंती नदीत सोडण्यात आले. वाढती लोकसंख्या, पाणी वापर लक्षात घेऊन २००९-१० साली ५२ कोटी ९९ लाख रुपये खर्चून रेल्वे रुळाच्या खालील संपूर्ण शहरात भूमिगत गटार करण्यात आले. त्याचे पाणी गोपाळपूर येथील स्वतंत्र सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पात नेऊन शुद्ध करून परत पुष्पावती नदीद्वारे चंद्रभागा नदीत सोडण्यात आले. तिसऱ्या टप्प्यात २०१८-१९ साली ५७.२६ कोटी रुपये खर्च करून सर्व उपनगरी भाग, इसबावी, भगवान नगर पासून सांगोला रोडची नागरी वसाहत, पंतनगर ते अक्षत बंगलोज पर्यन्तच्या वाढलेल्या नागरी वसाहती जोडून हे पाणी भूमीगत गटार योजनेतून प्रक्रिया करून नदीत सोडण्यात येऊ लागले.
इसबावी, विष्णूपद बंधारा आणि दगडी पुलावरील नवीन बंधारा या भागात दररोज लाखो लिटर्स मैलामिश्रित सांडपाणी थेट चंद्रभागा नदीत मिसळते. याकडे पंढरपूर नगरपालिका प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. पाणीपुरवठा विभागाकडे विचारणा केली असता शहरातील सर्वात मोठा सांडपाणी वाहक लेंडकी नाला या भूमिगत गटारास जोडण्यात आलेला नाही. त्यामुळे त्या नाल्यातून थेट सांडपाणी पुष्पावती नदीला जाते. तिच्या मार्गे विष्णूपद बंधारा येथे चंद्रभागा नदीत मिसळते. त्याखालील देगाव, मुंढेवाडी, अजनसोंड, चळे, सुस्ते, बिटरगाव अशा गावांना हेच सांडपाणी आणि मैलामिश्रित पाणी प्यावे लागते आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्रतिसाद नाही प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सोलापूर उपप्रादेशिक कार्यालयात संपर्क साधला असता, संबंधित अधिकाऱ्यांनी कसलाही प्रतिसाद दिला नाही. अनेकवेळा फोन केले असता प्रतिसाद दिला नाही, दुसऱ्या व्यक्तीच्या फोन वरून फोन केला असता चंद्रभागा प्रदूषणाचा विषय आहे असे सांगताच फोन बंद करण्यात आला. यावरून प्रदूषण नियंत्रण मंडळ या संवेदनशील विषयावर किती बेफिकीर आहे.
१० एमएलडी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचा प्रस्ताव तयार
नाला भूमिगत गटार योजनेला जोडण्यात आलेला नाही. टप्पा क्रमांक २ च्या सांडपाणी प्रकल्पात प्रक्रिया केलेले पाणी नदीला सोडले जाते. भूमीगत गटार योजना टप्पा क्रमांक ३ मधील पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी १० एमएलडी क्षमतेचा स्वतंत्र प्रकल्पाचा प्रस्ताव तयार केला आहे. यात्रेत नदीपलीकडील ६५ एकरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प कार्यान्वित आहे.''
आत्माराम जाधव, अभियंता, नगरपालिका पाणीपुरवठा विभाग
प्रकल्पाची क्षमता संपुष्टात
१३ वर्षांपूर्वी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी उभा केलेला प्रकल्प १५ एमएलडी क्षमतेचा आहे. आज शहरातील एकूण सांडपाणी दररोज १६ एमएलडी आहे. यात्रा आणि एकादशीच्या दिवशी यामध्ये १ ते १० एमएलडीपर्यंत वाढ होते. म्हणजे त्या काळात एवढे सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करताच चंद्रभागा नदीला सोडले जाते.
शहरातील काही भागातील सांडपाणी नदीत मिसळते आहे, ते पूर्णपणे बंद करण्यासाठी कन्सल्टंट कंपनीला सांगितले आहे. वाढीव उपनगरी भागासाठी भूमिगत गटार योजनेच्या चौथ्या टप्प्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. लवकरात लवकर हे पाणी बंद केले जाईल.''
अरविंद माळी, मुख्याधिकारी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.