आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरात आढावा:राम मंदिर बांधून कोरोना कमी होईल असे भाजपला वाटत असेल; अयोध्येतील भूमिपूजनावरून शरद पवारांचा पंतप्रधान मोदींना टोला

सोलापूर2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • येत्या 5 ऑगस्टला राम मंदिरांच्या भूमीपुजनाचा मुहूर्त ठरला आहे

कोरोनाला प्राधान्य हवे. भाजपवाल्यांना राम मंदिर बांधून कोरोना कमी होईल असे वाटत असेल तर हरकत नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांनी लगावला. देशभरात एकीकडे कोरोनाची स्थिती गंभीर होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ५ ऑगस्ट रोजी राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी अयोध्येला जाणार आहेत. यासंदर्भात पवारांना छेडले असता त्यांनी ही मार्मिक टिप्पणी केली.

सोलापुरातील कोरोना संसर्गाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी रविवारी ते येथे आले होते. लोकप्रतिनिधी, त्यानंतर वैद्यकीय आणि प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. कोरोनाची स्थिती देशातच गंभीर असताना केंद्राने राम मंदिराचे भूमिपूजन का ठरवले, या प्रश्नावर पवार म्हणाले, ‘आम्ही काेरोनाला प्राधान्य दिले आहे. भाजपवाल्यांना राम मंदिर बांधून काेरोना कमी होईल असे वाटत असेल तर हरकत नाही.’ या दौऱ्यात पवार यांच्यासमवेत आरोग्यमंत्री राजेश टोपे, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार प्रणिती शिंदे, महापौर श्रीकांचना यन्नम आदी उपस्थित होते.

निधी देताना केंद्राने दुजाभाव करू नये : 

साेलापुरातील मृत्युदर राज्यातील एकूण मृत्युदरापेक्षा अधिक आहे. त्यामुळे अधिक काळजी घ्यावी लागेल. बार्शी, अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर या तालुक्यातील स्थितीही आटोक्यात आणणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने अधिकाऱ्यांना बारकाईने उपाय राबवण्यास सांगितले. राज्याकडून निधीची कमतरता भासू देणार नाही, असे सांगताना त्यांनी केंद्रानेही भाजप आणि भाजपेतर राज्य असा दुजाभाव न करता निधी द्यावा, असा सल्लाही दिला.

मुंबईसह नाशिक, सोलापूर, जळगावातील स्थिती चिंताजनक

मुंबई, पुणे, नाशिक, जळगाव आणि सोलापूर या शहरांतील कोरोना संसर्गाची स्थिती काळजी करण्याजोगी आहे. लॉकडाऊन हा स्थानिक प्रशासनाचा निर्णय. त्यावर मी हस्तक्षेप करणे योग्य नाही. परंतु, धारावी अन् इतर ठिकाणची स्थिती आटोक्यात आली ती लोकांनी घरात बसल्याने. त्यांच्या सहकार्याशिवाय हा संसर्ग थांबणार नाही, असे पवार म्हणाले.

सीएसआर फंडमधून रेमडेसिवीर मिळणार

सोलापुरातील मृत्युदर पाहून पवार रेमडेसिवीरचे ८० इंजेक्शन घेऊन आले होते. हे महागडे इंजेक्शन गरिबांना मोफत देण्यासाठी आणले आहेत. उद्योजकांच्या ‘सीएसआर फंड’मधून हे इंजेक्शन उपलब्ध करून देण्याचे पवार यांनी ठरवले आहे. ज्या जिल्ह्यात मृत्युदर अधिक तिथे हे इंजेक्शन मोफत देता येईल याचे नियोजन करत असल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी या वेळी सांगितले.

पीक कर्जासाठी शासन-प्रशासन एकत्र येईल

शेतकऱ्यांना पीक कर्जे मिळत नाहीत, अशा तक्रारी आहेत. यावर बोलताना पवार म्हणाले, पालकमंत्री, जिल्हा प्रशासन आणि बँकांचे प्रतिनिधी एकत्र बसूनच यावर निर्णय घेऊ शकतील. कोरोनाचा शेतीवरही परिणाम झाला. मागेल त्याला तातडीने कर्ज देण्याचे नियोजन करण्याच्या सूचना केल्या आहेत. पीक कर्जापासून कोणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात येईल.

बातम्या आणखी आहेत...