आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजू शेट्टींची पवारांवर टीका:म्हणाले - शरद पवारांनी शेतकऱ्यांचे हीत न पाहता, बांडगुळांना पोसण्याचे काम केले

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शरद पवारांनी शेतकऱ्यांचे हीत न पाहता, बांडगुळांना पोसण्याचे काम केले,टिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. शेट्टी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने सोलापूरच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी पवारांवर जोरदार टीका केली आहे.

शेट्टी म्हणाले,“शरद पवार दहावर्षे कृषीमंत्री होते. नाबार्ड त्यांच्या हाताखालीच होते. त्या विभागास निधीची कमतरता नाही. नाबार्डने डेअरी उद्योगाप्रमाणे साखर उद्योगाला साखरेवर उचल किंवा कर्ज दिले असते तर साखर उद्योगाला जिल्हा बॅंक किंवा राज्य सहकारी बॅंकेकडून 13 टक्क्याने कर्ज घ्यावे लागले नसते. अवघ्या दोन टक्के व्याजदराने कर्ज मिळाल्यास साखर कारखाने अडचणी आले नसते. पण,त्यांनी तसे केले नाही. कारण, राज्य व जिल्हा बॅकेतील बगलबच्च्यांना त्यांना पोसायचे होते, असा आरोप त्यांनी केला. तसेच, राज्य व केंद्र शासनाच्या कृषी क्षेत्रासंदर्भातील अडचणींच्या मुद्यांवर दोन्ही सरकारच्या कार्यपद्धतीबाबत संताप व्यक्त केला.

साखर कारखान्यामध्ये साखर शिल्लक राहिल्यामुळे त्याच्यावर जे कर्ज काढले जाते त्याच्या व्याजाचा बोजा हा कारखान्यावर पडतो त्यामुळे शेतकऱ्यांनी तुकड्यातुकड्याने पैसे घ्यावे, असा साळसूदपणे सल्ला पवारसाहेब शेतकऱ्यांना देतात. मग, अठरा-वीस महिने शेतकऱ्यांचा ऊस शेतात उभा असतो, एवढे महिने शेतकऱ्यांचे पैसे त्यात गुंतलेले असतात, शेतकऱ्यांच्या त्या गुंतवणूकीवर व्याज त्यावर चालू असतेच की त्याचा विचार का केला जात नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.”

नितीन गडकरी यांच्या धोरणामुळे साखरेचे उत्पादन 22 टक्के कमी होऊन इथेनॉलचे उत्पादन वाढले. मात्र, हेच धोरण दहा वर्षे कृषीमंत्री असताना पवारांना का राबवता आले नाही? गडकरी हे कौतुकास पात्र आहेतच. मात्र, शरद पवार हे कृषीमंत्री होते, साखर कारखानदारांचे मंत्री होते, याबाबत आत्मपरिक्षण करणे गरजेचे असल्याचे, त्यांनी सांगितले.

खरीप हंगाम तोंंडावर आलेला असतानाही राज्यात रासायनिक खतं, बियाण्यांची टंचाई आहे. पेरणीची तयारी सुरू असताना, राज्याच्या कृषी विभागाने घरगुती बियाणे वापरण्याचा सल्ला दिला. पण, नेमके त्या विभागाने ऐवढे दिवस केले काय? खरीप हंगाम आढावा बैठक मुख्यमंत्र्यांनी घेणे अपेक्षित होते. रासायनिक खताच्या टंचाईस केंद्र शासन जबाबदार आहे, त्यांच्या धोरणांमुळे अडचण झाल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यसभेच्या निवडणुकीवरून सध्या सुरु असलेला घोडेबाजर, ऐकमेकांवर सुरु असलेल्या कुरघोड्या मी प्रेक्षक म्हणून पाहतोय. आगामी विधान परिषदेबाबत मला कोणतीही ऑफर नाही आणि माझी इच्छादेखील नाही. तसेच, लोकांना वाटत असेल की मी आमदार व्हावे तर लोकांनीच मला लोकवर्गणी करुन मला निवडून द्यावे, अशी अपेक्षाही शेट्टी यांनी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...