आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधन:शिक्षणमहर्षी माजी आमदार सि.ना.आलुरे गुरुजींचे निधन

अणदूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मान्यवरांच्या भावना : मराठवाड्याचे साने गुरुजी गेले

मराठवाड्याचे साने गुरुजी म्हणून ओळख असलेले, माजी आमदार काँग्रेसचे तत्त्वनिष्ठ नेते तथा शिक्षणमहर्षी सि. ना. आलुरे (गुरुजी) यांचे अल्पशा आजाराने ८९ वर्षी सोमवारी पहाटे साेलापुरातील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अणदूर (ता. तुळजापूर) येथे सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. मराठवाड्याचे साने गुरुजी गेले, अशा भावना मान्यवरांनी यावेळी व्यक्त केल्या.

सिद्रामप्पा नागप्पा आलुरे गुरुजी हे सि. ना. आलुरे गुरुजी नावाने ओळखले जात. तर बाबा म्हणूनही त्यांची ओळख होती. गेल्या चार महिन्यांपासून ते आजारी होते. पाच दिवसांपूर्वी त्यांना सोलापूर येथील अश्विनी रुग्णालयात दाखल केले होते. सोमवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. सकाळी ९ च्या सुमारास त्यांचे पार्थिव येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. यानंतर विविध क्षेत्रांतील मान्यवर, त्यांचे हितचिंतक, कार्यकर्त्यांनी त्यांचे अंतिम दर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. दुपारी दीडच्या सुमारास त्यांचे पार्थिव जवाहर महाविद्यालयाच्या प्रांगणात दर्शनासाठी ठेवण्यात आले. अनेक पुरस्कारांचे मानकरी ठरलेल्या व राजकारणातील संत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुरुजींना शेवटचा निरोप देण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. जवाहर महाविद्यालयाच्या प्रांगणात शासकीय इतमामात मानवंदना दिल्यानंतर वीरशैव लिंगायत परंपरेनुसार अनेक धर्मगुरू व मान्यवरांच्या उपस्थितीत गुरुजींचे पुतणे सरपंच रामचंद्र आलुरे यांच्या हस्ते विधी केल्यानंतर सायंकाळी ५.३० वाजता अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रांतील मंडळी उपस्थित होती. त्यांनी आठवणींना उजाळा दिला. यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले.

जवाहर विद्यालयाचे वटवृक्षात रूपांतर
१९८० च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून तुळजापुरातून आलुरे गुरुजी निवडून आले होते. पांढरेशुभ्र धोतर, शुभ्र नेहरू शर्ट व डोक्यावर गांधी टोपी हा त्यांचा पेहराव तर जवाहर विद्यालयातील विद्यार्थ्यांना खाकी हाफ पँट, पांढरा हाफ शर्ट व पांढरी टोपी हा पेहराव गेल्या ५० वर्षांपासून आजतागायत त्यांनी कायम ठेवला. जवाहर विद्यालयाची गांधी टोपी अनेकांना भावली. पन्नास वर्षांत या शिक्षण संस्थेचे वटवृक्षात रूपांतर झाले.

बातम्या आणखी आहेत...