आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रायगड दुमदुमणार:अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे 5 व 6 रोजी शिवराज्याभिषेक सोहळा

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने दि. 5 व 6 जून रोजी दुर्ग राज रायगडावर युवराज संभाजी छत्रपती महाराज व युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थित शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत आहे. यंदा "धार तलावारीची युध्दाकला महाराष्ट्राची', 'जागर शिवशाहीचा,स्वराज्याच्या इतिहासाचा' व "सोहळा पालखीचा स्वराज्याच्या ऐक्याचा' हे कार्यक्रम शिवराज्याभिषेक महोत्सवाचे आकर्षण बिंदू असतील. तरी या सोहळ्यास शिवभक्तांनी उपस्थित रहावे, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.

छत्रपती शिवरायांनी सुमारे साडेतीनशे वर्षापूर्वी लोकशाहीच्या तत्वावर स्वराज्याची उभारणी केली. अठरा अलुतेदार बारा बलुतेदारांना सोबत घेवून स्वराज्यात ऐक्य घडवले. छत्रपती शिवरायांचा 6 जून 1674 ला राज्याभिषेक झाला. स्वराज्याला छत्रपती मिळाले. महाराष्ट्रासह देशभरात ही घटना इतिहासात सुवर्णाक्षराने नोंद घेणारी ठरली. हा दिवस म्हणजे खऱ्या अर्थाने भारताचा पहिला स्वातंत्र्यदिन. तो राष्ट्रीय सण म्हणून साजरा होण्यासाठी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती कार्यरत आहे.

शाहिरी कार्यक्रम

राज्याभिषेकाच्या स्मृती चिरंतन राहाव्यात. यासाठी समितीतर्फे राज्याभिषेक सोहळा दिमाखात साजरा होतो. यंदा पाच जूनला सायंकाळी 5 वा. धार तलवारीची युध्द कला महाराष्ट्राची हा शिवकालीन युध्द कला प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी राज दरबार येथे जागर शिवशाहीचा, स्वराज्याच्या इतिहासाचा हा शाहिरी कार्यक्रम होणार आहे.

पालखीवर पुष्पवृष्टी

या कार्यक्रमात महारा राष्ट्रातील शाहीर यांनी सहभाग घ्यावा. दि 6 जून ला मेघडंबरीतील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला सुवर्ण नाण्याचा अभिषेक झाल्यानंतर सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा या पालखी मिरवणुकीत महाराष्ट्रातील बारा बुलतेदार,अठरा अलुतेदार सर्व धर्मातील लाेक सहभागी होणार आहेत. आपापल्या सांस्कृतिक पारंपारीक लोक कलांचा मिरवणुकीत जागर होईल. राजसदर, नगारखाना, होळीचा माळ, बाजारपेठ ते जगदीश्वर मंदिर असा पालखी सोहळ्याचा मार्ग असेल. या मार्गावरुन पालखीवर पुष्पवृष्टी केली जाणार आहे. सर्व शिवभक्तांनी पारंपारीक वेशभूषेत सहभागी व्हावे असे आवाहन समितीने केले आहे.

बातम्या आणखी आहेत...