आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Solapur
  • Shubhrai Saree Made By Textile Researcher Vinay Narkar After Years Of Study; Sant Shubhrai Maharaj's Painting Has A Special Style |marathi News

दिव्य मराठी विशेष:वस्त्र संशोधक विनय नारकरांनी वर्षाच्या अभ्यासानंतर बनवली शुभराय साडी; संत शुभराय महाराजांची चित्रकला विशिष्ट शैलीची

सोलापूर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अठराव्या शतकातील संत शुभराय महाराज हे बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे धनी होते. नृत्य, काव्य, संगीत आणि चित्रकलेच्या क्षेत्रातील एक अधिकारी व्यक्ती होते. त्यांच्या चित्रकलेत अध्यात्म आणि भक्तीचा अद्भुत संगम आहे. या चित्रकलेची एक विशिष्ट शैली आहे. चित्रकलेची ही धाटणी घेत युवा वस्त्र संशोधक विनय नारकर यांनी रेशमी नवरंगी शुभराय साडीची निर्मिती केली आहे. हे एक मोठे आव्हानात्मक काम होते. मात्र अभ्यास आणि भक्तीच्या जोरावर त्यांनी हे काम उत्कृष्टपणे पार पाडले आहे.

कलायोगी शुभराय महाराज यांच्या चित्रांचा अभ्यास करून हुबेहुब तशाच पद्धतीची चित्रे रेशमी साडीवर विणून घेण्याच काम विनय नारकर यांनी केले. महाराज प्रवास करायचे तेव्हा ते वेगवेगळ्या चित्रशैलींचा अभ्यास करून वेगळं काही टिपण्याचा प्रयत्न करत. कृष्णलीला, रासलीला, गॊपिकांसोबतचा कृष्ण, वेगवेगळे अवतार अशी चित्रे शुभराय महाराजांनी काढली आणि ती प्रसिद्ध आहेत. त्या चित्रांचे पुस्तक महाराष्ट्र शासनाने फार पूर्वी प्रकाशित केले आहे. शुभराय महाराज चित्रचिरंतन या नावाने प्रसिद्ध असलेल्या या पुस्तकाचा अभ्यास करून, इतरही संदर्भ घेत विनय नारकर यांनी या साडीची संकल्पना जन्माला घातली. वर्षभराच्या अभ्यासानंतर त्यातून अतिशय सुंदर आणि मनमोहक अशी शुभराय साडी तयार केली.

अशी सुचली संकल्पना
विनय नारकर यांचे घर हे शेणाने सारवलेले आहे. जुन्या वाड्याचे दरवाजे तांब्या पितळेच्या व पाषाण साहित्य याने नटलेले आहेत. घरातील प्रत्येक दरवाजावर त्यांनी शुभराय महाराजांच्या शैलीतील चित्रांचे रेखाटन केले आहे. शुभराय महाराजांचा कृष्णही वेगळा असून तो तसाच उतरवण्याचा प्रयत्न केला आहे. ही चित्रे पाहताना नेहमी त्यांना आपण यावर काहीतरी काम करायला हवे असे वाटायचे. त्यातूनच या साडीची निर्मिती केली आणि त्यात त्यांना यश मिळाले. त्यांनी तयार केलेल्या साडीच्या काठावर शुभराय महाराजांनी जशी वेल रेखाटली तशीच वेल साडीत विणली आहे. साडीच्या बुट्टीसाठी पाने, फुले यांचा वापर केला आहे.

पोथी लिहिताना रेखाटली होती चित्रे : शुभराय महाराज हे प्रवास करत असताना जे काही लिखाण करायचे त्या पोथ्यांच्या पुढेमागे ते वेगवेगळ्या प्रकारच्या चित्रांचा अविष्कार करायचे. या अनमोल ठेव्याचा प्रचार होणे महत्त्वाचे आहे. त्यासाठीच नारकर यांनी हे काम हाती घेतले. जेव्हा ही साडी निर्मित केली तेव्हा शुभांगी बुवा यांना बोलून नारकर यांनी पहिली साडी मठात अर्पण केली. शुभराय महाराजांनी रचलेले निवडक अभंग या साडीच्या पदराने काठावर विणले आहेत.

आव्हानात्मक काम होते
गेल्या अनेक वर्षांपासून महाराजांची अनेक चित्र जवळून पाहिली आहेत. वेगवेगळ्या ठिकाणच्या महाराजांच्या कलाकृती पाहताना ही चित्रे आपण साडीवर उतरवली तर फार सुंदर साडी होऊ शकेल याचा विचार मनात होता. शिवाय या कलाकृतीचा प्रचार, प्रसार होणे गरजेचे आहे. ते या माध्यमातून करता येईल असा विचार मनात घेऊन मी हे काम केले. हे काम आव्हानात्मक होते. मात्र ते अतिशय कलात्मक पद्धतीने पूर्ण झाले, याचा खूप आनंद होतो आहे. ''
विनय नारकर, वस्त्र संशोधक सोलापूर

बातम्या आणखी आहेत...