आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच कृषी सेवा केंद्रांतील रासायनिक खते गायब झाली आहेत. आठच दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील दुकानदारांकडे ४७ हजार मे. टन युरिया खत आले असताना दुकानदार खत उपलब्ध नसल्याचे शेतकऱ्यांना सांगत आहेत.
काही दुकानदार ठराविक ग्राहकांनाच तर काही दुकानदार चढ्या दराने खत विक्री करत आहेत. युरिया खत उपलब्ध नसल्याचे मार्च आणि एप्रिल महिन्यापासूनच दुकानदार सांगत आहेत. युरिया मुबलक उपलब्ध असल्याचे कृषी विभाग सांगत आहे. यामुळे शेतकऱ्यांसाठी आलेलं खत खातंय कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. महिनाभरात खरीप हंगामाची तयारी सुरू होईल, पण त्यापूर्वीच जिल्ह्यात खत दुकानांमध्ये रासायनिक खतांची कृत्रिम टंचाई जाणवत आहे.
सध्या जिल्ह्यातील कारखान्यांचा गाळप हंगाम संपला आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी शेतकरी खतांची खरेदी करतात, पण दुकानदार आतापासूनच खतांचा तुटवडा आहे, खते आलीच नाहीत, असे सांगून शेतकऱ्यांना पिटाळून लावत आहेत. काही दुकानदारांनी तर खते आली होती पण दोन दिवसांतच संपली असे सांगितले. प्रत्यक्षात आजही अनेक दुकानांमध्ये खते शिल्लक असताना दुकानदार फक्त जे अधिक पैसे देतील, अशा परिचयातील शेतकऱ्यांनाच खतविक्री करत आहेत.
२८० ची पिशवी तब्बल ४०० रुपयांना विकताहेत
जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपला आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी उसाची मशागत करून खते टाकली जातात. यामध्ये युरिया खताचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे युरियाला मोठी मागणी आहे. उसाची वाढ जोमाने होण्यासाठी शेतकरी अधिक दरानेही युरिया खरेदी करायला तयार असतात. याचा गैरलाभ घेण्यासाठीच २८० रुपयांची खताची एक पिशवी ४०० ते ५०० रुपयांपर्यंत विकली जात आहे. शेतकऱ्यांच्या गरजेचा गैरफायदा घेण्यासाठी अनेक दुकानदार युरियाची साठेबाजी करत असल्याचे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले.
कृषी विभागाने करावी कारवाई
उसाची तोडणी झाल्यानंतर त्यासाठी युरियाची मोठी मागणी असते. खत दुकानदार याचा गैरफायदा घेऊन जास्त दराने विक्री करतात. काही दुकानदार दुकानात खत असूनही नाही असे सांगतात. यावर कृषी विभागाने तपासणी करून कारवाई करावी.
-विजय रणदिवे, स्वाभिमानी शेतकरी संघटना.
परवाना रद्द करून गुन्हा दाखल करू
कृषी दुकानांमध्ये युरिया उपलब्ध आहे. जिल्ह्यास ४७ हजार मे. टन खत उपलब्ध झाले आहे. त्याचे तालुकानिहाय वाटपही केले आहे. जे दुकानदार युरिया खत देणार नाहीत वा चढ्या दराने खतांची विक्री करतील त्यांचा परवाना रद्द करून गुन्हे दाखल करू.
-बाळासाहेब शिंदे, जिल्हा कृषी अधीक्षक.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.