आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधोत्री येथून आठ वर्षांच्या मुलाचे पाच लाख रुपयांची सुपारी घेऊन अपहरण करणाऱ्या पाचही संशयितांना सोमवारी अक्कलकोट येथील न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी दिली. याप्रकरणी वळसंग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, मुलाला माडग्याळला नेत असल्याचे सांगून संशयितांनी अपहरण केले. त्याला हातपाय बांधून झाडाखाली टाकले. भूक लागल्यावर वडापाव, चुरमुरे व फरसाण खायला दिले.
मुख्य आरोपी संशयित धोंडप्पा शेडशाळ (वय २७, रा. किर्लोस्करवाडी, पलूस, जि. सांगली), सराफ व्यावसायिक रमेश भीमगोंडा बिरादार (वय ३८, रा. हल्लुर, ता. मडोलगी जिल्हा बेळगाव), नितीन उर्फ चार्ली धोंडप्पा शेडशाळ (रा. बाबानगर, ता. तिकोटा, जि. विजयपूर, सध्या रा. रामानंद नगर, नलावडे मळा, पलूस जि. सांगली), लक्ष्मण किसन चव्हाण (वय २७, रा. लऊळ, ता. माढा, जिल्हा सोलापूर), केदार बाळासाहेब शिवपूजे (वय २०, रा. कुंडल हायस्कूल रोड, पलूस, जि. सांगली) अशी कोठडी मिळालेल्या संशयितांची नावे आहेत.
धोत्री येथील बसस्थानकावरून पृथ्वीराज सुरेश बिरादार (वय ८) या मुलाचे ३० डिसेंबर रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास अपहरण झाले होते. वळसंग पोलिसांनी सांगली व बेळगावमधून अपहरण केलेल्या पाच संशयितांना अटक केली. रविवारी पोलिसांनी मुलाला सुखरूपपणे नातेवाइकांच्या ताब्यात दिले.
अपहरण झालेला मुलगा पृथ्वीराज हा कुंडल (सांगली) येथे आरोपी केदार शिवपूजे याच्याकडे मिळाला. पाचही संशयितांना कुंडल, पलूस (सांगली) व हल्लूर (बेळगाव) येथून ताब्यात घेतले. चौकशीत मुख्य संशयिताने पाच लाख रुपयांसाठी मुलाचे अपहरण केल्याची कबुली वळसंग पोलिसांना दिली आहे. हात-पाय बांधले, एका झाडाखाली टाकून दिले
मी शाळा शिकण्यासाठी धोत्री येथे मावशी सरूबाई यारगले यांच्याकडे राहतो. स्कूल बसने शाळेस जाण्यासाठी स्टँडकडे निघालो. बिराजदार यांच्या गाळ्याजवळ संतोष शेडशाळ व इतर एकाने मोटारसायकलवर बसवले. मी ओरडल्याने तोंड दाबले. तुला आईकडे माडग्याळला नेत असल्याचे म्हटले. मला त्यांनी एका गावात आंब्याच्या झाडाखाली हातपाय बांधून टाकले. भीतीने मी रडलो. मला भूक लागल्यावर वडापाव, चुरमुरे व फरसाण खायला दिले. नंतर पोलिसांनी मला सोडवून धोत्रीला आणले. पृथ्वीराज सुरेश बिरादार, मुलगा
मुलगा मिळाला याचा आनंद झाला
शिक्षणासाठी बहिणीकडे मुलाला ठेवले. पण आमच्या संपत्तीवर डोळा ठेवून त्याचे अपहरण झाले असावे. चुरमुरे व वडापाव खाऊन मुलाने दोन दिवस काढले. एका झाडाखाली हात-पाय बांधून ठेवले होते. पोलिसांमुळे त्याची सुटका झाली. पतीचे निधन झाले. एकुलत्या एका मुलाला पळवून नेल्याने आता काय होणार? याची काळजी वाटत होती. पण देवाच्या कृपेने मुलगा सुखरूप मिळाला, याचा मला आनंद झाला. गौरम्मा बिरादार, पृथ्वीराजची आई
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.