आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रशासकांना आणखी एक वर्ष मुदतवाढ देण्यासाठी भाजपच्या पाच आमदारांनी सहकारमंत्री अतुल सावे यांना पत्रे दिली. शासनाने मुदतवाढ देताच सहा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी त्याच्या विराेधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
पुढील महिन्यातील ३ जूनला प्रशासकांची मुदत संपत आहे. सहकारी संस्था निवडणूक पर्ाधिकरणाने निवडणूक घेण्यासंबंधी हालचाली सुरू केल्या होत्या. त्यात निभाव लागणार नाही म्हणून आमदार सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, राजेंद्र राऊत, राम सातपुते आणि समाधान आवताडे यांनी थेट सहकारमंत्र्यांना पत्रे देऊन प्रशासकीय कामकाजासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली.
बुधवारी मुदतवाढ देण्याचा निर्णय झाला. त्याला आव्हान देण्यासाठी उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी, नरोटेवाडी, साखरेवाडी, बाणेगाव, कारंबा आणि सोरेगाव या सहा संस्थांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. ॲड. अभिजित कुलकर्णी यांच्यामार्फत याचिका दाखल केली.
स्वायत्त प्राधिकरणालाही सत्ताधाऱ्यांनी केले ‘चूप’
‘सारे काही सत्तेसाठी’ अशा प्रकारचे हे राजकीय नाट्य जिल्हा बँकेच्या माध्यमातून सुरू झाले. त्यात सहकार प्रशासन सत्ताधाऱ्यांच्या हातातले बाहुले बनले. सहकारी संस्थांसाठी स्वतंत्र, स्वायत्त निवडणूक प्राधिकरण असावे, या हेतूने ९७ व्या घटना दुरुस्तीत सहकारी संस्था निवडणूक प्राधिकरण अस्तित्वात आले. परंतु जिल्हा बँकेसंदर्भात सत्ताधाऱ्यांनी या प्राधिकरणालाही ‘चूप’ केल्याचे दिसून येते.
प्रशासक कुंदन भाेळे हे वादग्रस्त अधिकारी आहेत. साेलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक असताना त्यांच्या विराेधात अनेक तक्रारी न्यायालयापर्यंत गेल्या हाेत्या. सिद्धेश्वर कारखान्याच्या निवडणुकीतील त्यांचा निर्णय धक्कादायक हाेता. तरीदेखील गेल्या नऊ वर्षांपासून त्यांनी साेलापुरात ठाण मांडलेले आहे.
प्रशासकीय कारभार रेटला
प्रशासकाचा कालावधी कायद्यानुसार एक वर्ष २९ मे २०१८ राेजी जिल्हा बँकेवर प्रशासक नियुक्तीचा आदेश निघाला. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम ११०-अ मधील तरतुदीनुसार त्यांचा कालावधी एकच वर्षाचा हाेता. २९ मे २०१९ राेजी त्याची मुदत संपली. त्यानंतर शासनाने तब्बल ६ वेळा मुदतवाढ देऊन ४ वर्षे प्रशासकीय कारभार रेटला. तरीदेखील बँकेच्या आर्थिक स्थितीत फारशा सुधारणा झालेल्या नाहीत.
आणखी एक वर्षाची मुदतवाढ मागणाऱ्या सहकार आयुक्तांच्या प्रस्तावात २३ सहकारी संस्थांकडे ११७० काेटी रुपये अडकून पडल्याचा तपशील आहे. संचालक मंडळ बरखास्त करण्यासाठी हीच यादी सहकार विभागाने पुढे केलेली हाेती. चार वर्षे कारभार करूनही मुदतवाढीसाठी पुन्हा तीच यादी पुढे आली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.