आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साेलापूर:पावसाच्या पाण्यात वाहून गेलेल्या बालिकेला सुखरूप बाहेर काढले, गृहमंत्र्यांकडून काैतुक

साेलापूर / श्रीनिवास दासरीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • साेलापूरच्या कन्येचे गृहमंत्र्यांकडून काैतुक

महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवरील बापूगाव (जि. पालघर) हे आदिवासींचे छाेटे शिवार. मुंबईसह या भागात जाेरदार पाऊस सुरू हाेता. लिलका कुटुंबीय शेतातल्या घरातच झाेपले हाेते. गुरुवारी मध्यरात्री दाेनच्या सुमारास पावसाच्या पाण्याचा एक माेठा प्रवाह या घरात शिरला आणि घरातील सर्व साहित्य वाहून गेले. लिलका कुटुंबकर्ता विजय यांनी साहित्याकडे न पाहता मुलांचा हात धरला. याच गडबडीत पाच वर्षीय ममताचा हात सुटला आणि ती वाहून गेली. रात्रीच्या अंधारात ती कुठे गेली याचा पत्ताच लागला नाही. ही वार्ता कासा पाेलिस ठाण्याला कळली. सहायक पाेलिस निरीक्षक सिद्धव्वा ऊर्फ सीमा जायभाये या बाहेर पडल्या. पुढे काय झाले हे त्यांच्याच शब्दांतून...

‘ममताचे काका पाेलिस मित्र आहेत. त्यांनी तातडीने खबर दिली म्हणून मी एक दाेर घेऊन बाहेर पडले. ताेपर्यंत गावकरीही साेबत आले. त्यांच्या हाती काठ्या हाेत्या. साधारण अडीच वाजले असतील. सर्वत्र अंधार हाेता. माेबाइल बॅटऱ्यांच्या प्रकाशातून वाट काढत आम्ही बापूगाव शिवारापासून ४०० मीटर चालत गेलाे. अर्थातच प्रवाहाच्या दिशेने. ममताच्या आवाजाचा वेध घेतच सर्व जण हळुवार पावले टाकत हाेते. यात साधारण तासाभराचा वेळ गेला असेल. त्या वेळी पावसाचा जाेर कमी झाला हाेता. पाणीही बऱ्यापैकी आेसरलेले हाेते. आम्ही थांबलाे. त्या काळाेखात ममताच्या रडण्याचा आवाज एेकू आला. आम्हा सर्वांचे कान टवकारले. आवाजाच्या दिशेने झपझप पावले टाकत आम्ही एका झाडाजवळ पाेहाेचलाे तर तिथे ममता त्या झाडाला धरून पाण्याच्या प्रवाहाच्या विराेधात झुंज देत हाेती. मी तिच्या दिशेने उडी घेतली. साधारण कमरेपर्यंत पाणी हाेते. तिला वर उचलले. गावकऱ्यांच्या मदतीने बाहेर पडले. खरे पाहता ममताच्या धाडसाचे काैतुक केले पाहिजे. हडकुळी ममता सुमारे दाेन तास पाण्याच्या प्रवाहात राहून एका झाडाला धरून हाेती. तिने तिथेही हात साेडला असता तर... तिला तातडीने प्राथमिक उपचार केंद्रात दाखल केले. शुक्रवारी तिला घरी साेडण्यात आले.’

साेलापूरच्या कन्येचे गृहमंत्र्यांकडून काैतुक
ही संपूर्ण घटना पालघर जिल्हाप्रमुख कार्यालयात पहाटेच पाेहाेचली. तिथून गृहमंत्री अनिल देशमुखांपर्यंत. शुक्रवारी देशमुख यांनी ट्विट करून जायभाये यांच्या धाडसाचे काैतुक केले. पाेलिस खात्यातील ‘रिअल हीराे’ असा त्यांनी उल्लेख केला. जायभाये या साेलापूर जिल्हा परिषदेतील निवृत्त सेविका शांताबाई मुंडे यांच्या कन्या आहेत. त्यांचे शिक्षण दमाणी शाळेत झाले. त्या लहानपणापासूनच धाडसी असल्याचे आई शांताबाई म्हणाल्या.

बातम्या आणखी आहेत...