आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वागत:सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखेंच्या स्वागताला काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांची गर्दी

नवनाथ पोरे |पंढरपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसचे माजी मंत्री सध्याचे भाजपचे नेते तथा सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या स्वागतासाठी मंगळवारी पंढरीत भाजपपेक्षा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची गर्दी पाहायला मिळाली.

पंढरपूर शासकीय विश्रामगृहात विखेंच्या स्वागताच्या शब्दात कमालीची आपुलकी आणि पालकमंत्र्यांनी केलेल्या ख्याली-खुशालीच्या शब्दात अपार जिव्हाळा दिसून आला. तीन वर्षांपूर्वी काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते असलेले राधाकृष्ण विखे-पाटील १५ वर्षे काँग्रेस आघाडीत मंत्री असल्याने पंढरपूर तालुक्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांशी त्यांचा घनिष्ट संबंध होता. दिवंगत आमदार भारत भालके हे २०१४ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर आमदार झाले होते. त्यामुळे त्यांच्याशी विखे पाटलांचे अतिशय निकटचे नाते निर्माण झाले होते. मधल्या काळात विखे-पाटील आणि जिल्ह्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या वाटा जरी बदलल्या असल्या तरीही जुने ऋणानुबंध तुटलेले नाहीत. त्यामुळे राधाकृष्ण विखे-पाटील पंढरपूरला मुक्कामी येत आहेत, हे समजताच एरव्ही पंढरपूरकडे न फिरकणारे जिल्ह्यातील काही नेते रात्रीच त्यांना भेटून गेले.

भारत भालके यांचे चिरंजीव राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके सकाळी ९ वाजताच शाल, बुके घेऊन त्यांच्या स्वागतासाठी शासकीय विश्रामगृहावर पोहोचले. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील त्यांच्या सोबत सावलीसारखे दिसून येत होते. संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष किरण घाडगे, राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष संजय बंदपट्टे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अॅड. राजेश भादुले यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी यांनी विखे-पाटील यांना निवेदने दिली.

बातम्या आणखी आहेत...