आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये इच्छाशक्ती मोठी असते. मात्र त्यांना वाव देणे गरजेचे आहे. तेव्हा दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये असलेली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी त्यांना मिळेल तिथे संधी द्या, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेतील मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार यांनी केले.
जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून सोलापूर जिल्हा परिषदेतील समाज कल्याण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले.
जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर अध्यक्षस्थानी होते.वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता सच्चिदानंद बांगर, दिव्यांग संस्था चालक शशिभूषण यलगुलवार, भीमराव धोत्रे, राजकुमार पाटील, वसंत धोत्रे, चित्रसेन पाथरुट यावेळी उपस्थित होते. नेहरू नगर येथील श्री शिवाजी अध्यापक विद्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या या क्रीडा स्पर्धेत अंध, मतिमंद, मुकबधीर, अस्थिव्यंग या प्रवर्गातील एक हजार तीनशे विद्यार्थी सहभागी झाले असून या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या व्यवस्थेसाठी 350 शिक्षक व कर्मचारी तैनात आहेत.
80 क्रीडा प्रकारच्या क्रीडा स्पर्धा होणार आहेत. हार झाली तर नाराज होऊ नका.असा संदेश देऊन पवार म्हणाले,आज हार झाली तर पुढे जिंकू, ही इच्छाशक्ती ठेवावी. एकीकडे निसर्गाने अन्याय केला असला तरी देखील दुसरीकडे दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये प्रबळ इच्छाशक्ती असते.मात्र त्यांनी संधी उपलब्ध होत नाही, ही खरी खंत आहे.
अध्यक्षीय भाषणात खमितकर म्हणाले, आज सामान्य बुद्धीमत्तेची मुले मोबाईलच्या आहारी गेल्याचे चित्र आहे.मात्र दिव्यांग विद्यार्थी मैदानी खेळ खेळतात, ही कौतुकास्पद बाब आहे. एवढ्या मोठ्या संख्येने दिव्यांग विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेत सहभागी करुन यशस्वी नियोजन करणारा सोलापूर हा राज्यातील एकमेव जिल्हा आहे. वेदनेवर मात करुन जीवनात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून दिव्यांग विद्यार्थी जीवन जगतात,हा त्यांचा आदर्श सामान्य माणसांनी घेण्याची गरज आहे.नजर बदलो, नजारा बदल जाएगा, असा संदेशही त्यांनी दिला.
प्रणव शिंदे, राजा समशेर, पृथ्वीराज शिंदे, शशिकांत पाटील या खेळाडुंनी क्रीडा ज्योत आणली.पांडुरंग भदे या विद्यार्थ्यांने खेळाडूंना शपथ दिली. रोहन भालेराव यांनी विद्यार्थ्यांना सांकेतिक भाषेत मुकबधीर विद्यार्थ्यांना कार्यक्रमाचा वृत्तांत सांगितला. दत्ता मोकाशी, कमलाकर तिकटे यांनी सूत्रसंचालन केले.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सच्चिदानंद बांगर, अरुण धोत्रे, राजकुमार पाटील, प्रशांत पवार, कालिदास लोखंडे, कमलाकर तिकटे, रामचंद्र कुलकर्णी आदी उपस्थित होते.
बुधवारी (4 जानेवारी) छत्रपती शिवाजी रंगभवनमध्ये सकाळी दहा वाजता दिव्यांग विद्यार्थ्यांचा जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. तरी दिव्यांग विद्यार्थ्यांचा कलाविष्कार पाहण्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता सच्चिदानंद बांगर यांनी केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.