आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सोलापूर लॉकडाऊन:आजपासून सोलापूर 10 दिवसांसाठी बंद, विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांचे फोटो काढून गुन्हे दाखल करण्याचे आदेश; संचारबंदीपूर्वी खरेदीसाठी लगबग

सोलापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कडक अंमलबजावणीसाठी मेडिकलवरही असणार नजर
  • प्रतिजन (अँटीजेन) चाचणीला येईल वेग, तीस टीम तयार

सोलापुरातील कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता साखळी तोडण्यासाठी आजपासून जिल्हाभरात कडक लॉकडाऊन लावण्यात येत आहे. पुढील 10 दिवसांसाठी 26 जुलैपर्यंत हा लॉकडाऊन असेल. गुरुवारच्या मध्यरात्रीपासून सुरू होणाऱ्या लाॅकडाऊनपूर्वी दहा दिवसांसाठी लागणारे घरातील सर्व सामान खरेदी करण्यासाठी शहरातील नागरिकांनी बाजारपेठांमध्ये धाव घेतली. सायंकाळी सात वाजेपर्यंत धांदल सुरू होती. दरम्यान दहा दिवसांचे लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी लॉकडाऊन सहायकांनी संबंधितांचे फोटो काढावे, नोंद ठेवावी आणि पोलिसांच्या मदतीने त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे, अशा सूचना महापालिका उपायुक्त पंकज जावळे यांनी यावेळी केल्या. लॉकडाऊन काळात नियम मोडला तर कारवाई केली जाईल, असे इशारायुक्त आवाहन पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी केले आहे.

संचारबंदीपूर्वी खरेदीसाठी लगबग, व्यापाऱ्यांची शटरडाऊनची घाई

गुरुवारच्या मध्यरात्रीपासून सुरू होणाऱ्या लाॅकडाऊनपूर्वी दहा दिवसांसाठी लागणारे घरातील सर्व सामान खरेदी करण्यासाठी शहरातील नागरिकांनी बाजारपेठांमध्ये धाव घेतली. सायंकाळी सात वाजेपर्यंत धांदल सुरू होती. कोणी पेट्रोल भरत होते, कोणी खरेदी करत होते, कोणाला घरी पोहोचायचे होते. अशातच पोलिसांच्या धाकाने सात वाजता कुलूप लावून दुकानाचे शटर डाऊन करायची धांदल व्यापाऱ्यांची सुरू होती. गुरुवारी दिवसभरातील वातावरण काही धावपळीचे गेले. त्यातच बारावीचा निकाल लागल्याने मिठाई खरेदीमुळे हॉटेल व्यावसायिक खूप दिवसांनंतर आनंदात दिसले. पण, सायंकाळी सात नंतर तब्बल दहा दिवसांसाठी त्यांना आता व्यवसाय बंद करावा लागत आहे. शुक्रवारपासून मेडिकल वगळता सर्व दुकाने सुरू राहणार नाहीत. त्यामुळे गुरुवारीच लोकांनी खरेदी केली. दरम्यान, शहरात गुरुवारी दिवसभरात ४७ दुचाकी वाहनांवर कारवाई करण्यात आली तर पाच व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
नियम मोडला तर कारवाई : पोलिस आयुक्त

लॉकडाऊनचा पूर्ण काळ घरी बसून काम करावे. नियम मोडला तर कारवाई केली जाईल, असे इशारायुक्त आवाहन पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी केले आहे.

विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांचे फोटो काढून गुन्हे दाखल करण्याचे आदेश

दहा दिवसांचे लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी लॉकडाऊन सहायकांनी संबंधितांचे फोटो काढावे, नोंद ठेवावी आणि पोलिसांच्या मदतीने त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे, अशा सूचना महापालिका उपायुक्त पंकज जावळे यांनी यावेळी केल्या.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दहा दिवसांचे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. या कालावधीमध्ये कोणीही घरातून बाहेर पडू नये, या कालावधीमध्ये घरोघरी सर्वेक्षण करून प्रतिजन (अँटीजेन) चाचणीतून कोरोना बाधितांचे शोधकार्य केले जाणार आहे. या सर्व कामासंदर्भात प्रशिक्षण देण्याकरिता महापालिकेने गुरुवारी दुपारी दोन वाजता हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये प्रशिक्षण आयोजित केले होते. यावेळी मार्गदर्शन करताना तेे बोलत होते.

जे अधिकारी आणि कर्मचारी आहेत त्या सर्वांनी मास्क वापरणे आणि सोशल डिस्टन्स ठेवणे आवश्यक आहे. हे नियम पाळत त्यांनी सर्व्हे करावा. सर्व्हे करताना चारशे लॉकडाऊन सहायकांचे पथक असेल. हे पथक तीन शिफ्ट मध्ये काम करेल. एका शिफ्टमध्ये एका प्रभागात चार जण काम करतील. त्यांच्यावर झोनल ऑफिसरसुध्दा असतील. या टीमने कुठल्याही नागरिकाला विनाकारण घराबाहेर पडू देऊ नये. अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडल्यास त्याचे कागदपत्र तपासावे. हे करत असताना सोशल डिस्टन्स ठेवावे. जो विनाकारण बाहेर पडला असेल किंवा तो कुठल्याही नियमांचा उल्लंघन करत असेल तर त्याच्यावर पोलिसांच्या मदतीने गुन्हा दाखल करा, अशा स्पष्ट सूचना श्री. जावळे यांनी यावेळी केल्या.

कडक अंमलबजावणीसाठी मेडिकलवरही असणार नजर

संचारबंदीच्या कडक अंमलबजावणीसाठी महापालिकेचे चारशे जणांचे पथक नियुक्त केले जाणार आहे. या पथकाद्वारे मेडिकलवर नजर ठेवली जाणार आहे. जे मेडिकल सुुरू राहतील त्यांनी औषधाशिवाय काही दुसरे विकू नये. जर विकले तर त्यांच्यावर या पथकाची नजर असेल. असे आढळून आले तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

प्रतिजन (अँटीजेन) चाचणीला येईल वेग, तीस टीम तयार

प्रतिजन (अँटीजेन) चाचणी करण्यासाठी तीस टीम तयार करण्यात आली आहे. यातील पंधरा टीम कंटेनमेंट झोनमध्ये काम करतील. पंधरा टीम कंटेनमेन झोन सोडून इतर परिसरात काम करतील. एका टीममध्ये तिघे असतील. एक लॅब टेक्निशियन आणि दोन मदतनीस. याचे किट लवकरच प्राप्त होतील. उद्यापासून या चाचणीला वेग येईल, अशी माहिती श्री. जावळे यांनी दिली.

नागरिकांना सहकार्य करण्याचे आयुक्तांचे आवाहन

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जाहीर करण्यात आलेला दहा दिवसांचा लॉकडाऊन यशस्वी करा. यासाठी प्रत्येकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी केले. त्यांनी विनाकारण फिरणाऱ्यावर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा दिला.