आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर:तिसऱ्या लाटेची भीती : लॉकडाऊन की कडक निर्बंध? फैसला सोमवारी, सिद्धेश्वर यात्रेचा आज निर्णय

सोलापूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई, पुणेसह देशभरात तिसरी लाट आली असून, कोराेनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मुंबई तर सध्या हॉटस्पॉट झाले आहे. मागील चार दिवसांपासून शहर, जिल्ह्यात बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. शहर, जिल्ह्यात शुक्रवारी ८९ रुग्ण बाधित आढळले आहेत. रुग्ण वाढीचा वेग पाहता सोमवारपर्यंत किती रुग्ण वाढतील याचा अंदाज घेण्यात येईल. परिस्थिती कशी राहिल ? हे पाहून सोमवारी निर्णय घेण्यात येणार आहे. निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व पोलिस आयुक्त यांना देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

शहर, जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत आहे. मागील आठ दिवसांत जिल्ह्यातील बाधित रुग्णसंख्या आता १० वरून १०० वर पोहोचत आहे. यामुळे अधिकाधिक नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे. प्रशासनाकडून प्रत्येक केंद्रावर मुबलक प्रमाणात लस उपलब्ध आहे. जिल्ह्यातील साडेचार लाख नागरिकांनी अद्याप पहिला डोस घेतला नाही. कोरोना संसर्ग थोपविण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. संख्या वाढल्यास प्रशासनाला निर्णय घ्यावा लागणार आहे. कोणाचे नुकसान व्हावे वा कोणास त्रास व्हावा म्हणून निर्णय घेण्यात येणार नसून, तो जनतेच्या काळजीपोटी निर्णय घ्यावा लागणार असल्याचे पालकमंत्री भरणे यांनी स्पष्ट केले.

सिद्धेश्वर यात्रेचा आज निर्णय
ग्रामदैवत श्री सिध्देश्वर महाराज यात्रा सुरू होत असून, त्यासाठी शासनाकडून अद्याप परवानगी मिळाली नाही. यात्रेचा निर्णय घेण्यासाठी आपत्कालीन समितीची बैठक शनिवारी होण्याची शक्यता आहे. त्या बैठकीत यात्रेबाबत निर्णय होईल, असे महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, पोलिस आयुक्त हरिश बैजल यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत यात्रा परवानगीबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

शासन आदेशानुसार होणार यात्रा...
श्री सिद्धेश्वर महाराज हे सोलापूरचे ग्रामदैवत आहे. शिवाय सोलापूर परिसरासह पंचक्रोशीत श्रध्दास्थान आहे. त्यामुळे यात्रा झालीच पाहिजे. यात्रा प्रथे-परंपरेनुसार होईल यात कोणतीही शंका नाही. सध्याची स्थिती पाहता कोरोनाचे निर्बंध लावण्यात येतील. सिद्धेश्वर यात्रेबाबत ज्या शासनाकडून सूचना देण्यात येतील त्यानुसार यात्रा करण्यास परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री भरणे यांनी दिली.

...तर काय होणार बंद
रुग्णवाढीचा वेग पाहून लॉकडाऊन की कडक निर्बंध ? यावर निर्णय घेण्यात येईल. पण पहिल्या टप्प्यात शाळा, आठवडी बाजार, गर्दी होणारी ठिकाणे यावर निर्बंध लावण्यात येतील. शनिवारी व रविवारी होणारी गर्दी टाळण्यासाठी वीकेंड लॉकडाऊनचाही पर्याय असणार आहे. शाळा बंदबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नाही ? पहिली ते आठवी शाळा सुरू आहेत. पण रुग्णांची संख्या व होत असलेली वाढ पाहून सोमवारी त्यावर प्रशासनाकडून निर्णय जाहीर केला जाणार असल्याची माहिती पालकमंत्री भरणे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...