आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

7 वर्षांनी भेट:पाकिस्तानमध्ये सापडलेले लऊळचे सत्यवान सात वर्षांनी परतले घरी, 90 वर्षीय आई केसरबाई गहिवरल्या

​​​​​​​माढा (संदीप शिंदे )एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सत्यवान हे पत्नी समवेत 2013 मध्ये दवाखान्यात गेले असता ते तेथून हरवले होते

पुण्यातुन सात वर्षापूर्वी गायब झाल्यानंतर पाकिस्तानात पोहोचलेले सत्यवान भोंग गुरुवारी सायंकाळी आपल्या गावी लऊळ येथील घरी परतले. इतकी वर्षे मुलाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या आणि त्याची चिंता सतावणाऱ्या 90 वर्षीय आई केसरबाई भोंग यांना मुलगा सत्यवान आल्याचे कळताच त्या गहिवरल्या.

मायेने गोंजारत ए सत्यवान कुठं गेलतास सात वरीस... काय खाल्लंस कुठं राहीलास रं पोरा अशी चौकशी करताना वृध्दापकाळाने अंधत्व आलेल्या केसरबाई गहिवरल्या होत्या. त्यांच्या डोळ्यातुन आनंदाश्रु वाहत होते. सत्यवान घरी पोहचल्याने आई, भाऊ, पुतण्यासह अन्य नातेवाईक आनंदून गेले.

लऊळ गावच्या हद्दीत श्रीसंत कुर्मदास साखर कारखान्याच्या परिसरात वास्तव्यास असलेल्या सत्यवान हे पत्नी समवेत 2013 मध्ये दवाखान्यात गेले असता ते तेथून हरवले होते. त्यानंतर ते पाकिस्तानात सापडल्याची माहिती समोर आली. पाकिस्तान प्रशासनाने भारतीय उच्चा युक्तालयाशी संपर्क साधून पासपोर्ट काढल्यानंतर भारतात पाठवले होते. तीन महिन्यापूर्वी अमृतसर(पंजाब)मध्ये पोहचले खरे मात्र तीन महिने लोटुन गेले तरीदेखील सत्यवान कुटुंबियांच्या भेटीपासून वंचित राहिले होते .या प्रकरणावरुन शासकीय अनास्थेचे दर्शन घडले.

तीन महिन्यांपूर्वीच परतले आहेत भारतात
कुर्डूवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक हनुमंत वाघमारे, अन्य पोलिस व भोंग यांचे नातेवाईकांनी अमृतसर च्या श्री गुरुनानक संस्थेत जाऊन ताब्यात घेतले. अन ते गुरुवारी सायंकाळी सत्यवान यांना आपल्या गावी पोहचवले. महाराष्ट्र प्रशासनाकडुन सत्यवान यांना आणण्यासाठी प्रकिया जलदगतीने राबवण्याची गरज होती. मात्र यामध्ये तसे घडताना दिसले नाही. सत्यवान यांना कुटुंबियांपर्यंत पोहोचवण्यास उशीर का झाला यावर पोलिसांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

बातम्या आणखी आहेत...