आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर:भावाने बहिणीस ‘तुझी बॅग भर’ म्हणताच जवानाकडून गोळीबार; 1 ठार, 2 गंभीर

वैराग (जि. सोलापूर)3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भातंबरे (ता. बार्शी) येथे पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन एसआरपीएफ जवानाने मेहुण्यासह त्याच्या मित्रावर गोळीबार केला. या घटनेत मेहुण्याचा मित्र ठार झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी, २० आॅक्टोबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. या घटनेची वैराग (ता. बार्शी) पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आरोपी एसआरपीएएफ जवान गुरुबा महात्मे याचा पाच वर्षांपूर्वी सापनाई (ता. कळंब, जि. उस्मानाबाद) येथील जालिंदर काकडे यांच्या मुलीशी विवाह झाला आहे. त्यांना एक मुलगा व मुलगी आहे. महात्मे हा मुंबईत कार्यरत आहे. अनेक दिवसांपासून त्याचे आपल्या पत्नीशी चारित्र्याच्या संशयावरून सतत भांडण होत होते. घटनेच्या दिवशीही भांडणानंतर आरोपीच्या पत्नीने वडिलांना फोन करून माहिती दिली. त्यानंतर रात्री आरोपीचे मेहुणे अमर काकडे व त्यांचे मित्र नितीन भोसकर, काशीनाथ काळे सर्व (रा. सपनाई, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) असे तिघे आरोपीच्या पत्नीस नेण्यासाठी आले होते.

यादरम्यान गावातील प्रमोद वाघमोडे, सासू-सासरे, दीर यांच्यासमोर भांडण मिटवण्यासाठी चर्चा सुरू होती. या वेळी भांडणात तणाव वाढत गेला. तेव्हा अमर काकडे यांनी आपल्या बहिणीस, ‘मी तुला घेऊन जाण्यास आलो आहे. तुझी बॅग भर,’ असे सांगितले. तेव्हा गुरुबा महात्मे याने चिडून कमरेचे पिस्तूल काढून चार वेळा गोळीबार केला. यात काकडे यांचे मित्र नितीन भोसकर हे जखमी झाले. त्यांचा उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तंटा मिटवण्यास आलेले गुरुबाचे चुलतभाऊ बालाजी महात्मे हे गोळीबारात जखमी होऊन खाली पडले. काशीनाथ काळे व जालिंदर काळे पळून जात असताना त्यांच्यावरही आरोपीने गोळीबार केला. मात्र, गोळी चुकल्याने ते थोडक्यात बचावले. गुरुबा याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक पिस्तूल व २६ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. आरोपीस बार्शी सत्र न्यायालयात उभे केले असता २३ आॅक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...