आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरच्या हुन्नरी शशिकला:खलनायिका तरीही रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या; 9 वर्षे मदर तेरेसांकडे सेवा

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रिमिअर सोलापुरात, 'लेक चालली सासरला' या मराठी चित्रपटात त्यांनी खाष्ट सासूची भूमिका निभावली होती

४ ऑगस्ट १९३२ रोजी सोलापूरच्या माणिक चौकातील आनंदराव आणि लक्ष्मीबाई जवळकर यांच्या शशिकला जन्माला आल्या. अप्रतिम सौंदर्य लाभलेले हे रूप जणू अभिनयासाठी जन्माला आले होते, असे त्यांच्या कुटुंबात सगळे म्हणत, अशी माहिती त्यांचे भाचे मोहन जवळकर यांनी दिली. त्यांचे वडील हे नाटकातील कलाकारांचे कपडे शिवून आपले घर चालवीत असत. पण पुढे त्यांना मुंबई गाठावी लागली. वयाच्या पाचव्या वर्षांपासून मेळ्यात काम करणाऱ्या या अभिनेत्रीने वयाच्या ११ व्या वर्षांपासून हिंदी, मराठी चित्रपटात काम केले होते.

कुटुंबाच्या पोशिंद्या
शशिकला यांना दोन बहिणी, तीन भाव होते. भाऊ मनोहर हा लवकर गेल्याने त्याच्या दोन्ही मुलांची जबाबदारी शशिकला यांच्यावर आली. तर पुढे भाऊ विश्वास आणि मधुकर यांना देखील त्यांनी प्रचंड आर्थिक सहाय्य केले. त्याच बरोबर भावसार समाजाला देखील वेळोवेळी मोठ्या प्रमाणावर देणगी देऊन त्यांनी सहकार्य केले. पण खऱ्या अर्थाने कुटुंबाच्या पोशिंदा म्हणून त्या फार मोठ्या मनाच्या होत्या. त्या नेहमी आपल्याला दोन मुली आहेत, असे सांगायच्या. त्यांची मुलगी शैलजा ही त्यांच्या पोटी जन्माला आलेली. पण रेखा त्यांची मुलगी म्हणून ओळखली जाणारी त्यांची खरी भाची होती. भावाच्या पश्चात त्यांनी या मुलीला खूप शिकवले आणि दिल्लीत असणाऱ्या एका उद्योगपतीशी तिचा विवाह करून दिला.

जुने घर समाजाला देण्याची होती इच्छा
सध्या माणिक चौकात असणारे जवळकर यांचे घर म्हणजेच जुना वाडा हा कोणीही नसल्याने तसाच पडून होता. तो पुढे कोणाला तरी विकण्यात आला. पण तो विकण्यापूर्वी त्यांनी आपला भाचा मोहन जवळकर यांच्याकडे हे घर आपल्या भावसार समाजासाठी दे तिथे समाजाचे कामकाज चालू दे अशी इच्छा व्यक्त केली होती. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे ते शक्य होऊ शकले नाही.

९ वर्षे मदर तेरेसांकडे सेवा
शशिकला यांचे ओमप्रकाश सैगल याच्याशी लग्न झाल्यानंतर सतत वाद मारहाण होत. त्यामुळे कंटाळून त्या परदेशी गेल्या. मात्र त्यानंतरही त्यांना शांतता लाभली नाही तिकडून त्यात थेट कलकत्त्याला गेला आणि तिथे ९ वर्षे मदर तेरेसा यांची सेवा केली. त्यांच्या माध्यमातून त्या खऱ्या अर्थाने त्यांनी शांती अनुभवली.

श्रद्धानंदमध्ये केल्या तालमी
त्याकाळी सोलापुरात ठिकाणी रस्त्यावर चालणारे किंवा रिकाम्या जागी चालणारे मेळे असायचे, त्यात बत्तुल पार्टी, संगम मेळा अशा अनेक पार्टी होत्या. मात्र शशिकला या श्रद्धानंद तालमीत रोज आपल्या कलाकृतीचे धडे गिरवत होत्या. त्यातून त्यांची संवादफेक, नृत्य अभिनय, भावमुद्रा, देहबोली याचा सुंदर पद्धतीने विकास झाला. पुढे त्यांनी याच बळावर चित्रपट सृष्टीवर अधिराज्य गाजवले.

  • प्रिमिअर सोलापुरात लेक चालली सासरला या मराठी चित्रपटात त्यांनी खाष्ट सासूची भूमिका निभावली होती. या चित्रपटाचा सोलापूरच्या प्रभात चित्रपटगृहात झालेल्या प्रिमिअरला त्या सोलापुरात आल्या होत्या.
  • ज्वारीची भाकरी प्रचंड आवडे शशिकला जोपर्यंत सोलापुरात होत्या आणि जेव्हा जेव्हा सोलापुरात यायच्या तेव्हा त्या मला केवळ भाकरी हवी, असे आवर्जून सांगायच्या. अशी माहिती अलमेलकर कुटुंबाने दिली.
  • तुळजापूरची भवानी श्रद्धास्थान भाचे बाळासाहेब जवळकर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे त्यांची सोलापूरच्या देवी तुळजाभवानीवर प्रचंड श्रद्धा होती. त्यामुळे त्या वारंवार तुळजापूरला येत आणि दर्शन घेऊन जात.
बातम्या आणखी आहेत...